TOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

लिव्हिंगस्टोनची चौथ्या क्रमांकावर मुसंडी; पंजाब किंग्जची ११.५० कोटींची बोली

गतहंगामात राजस्थान रॉयल्स संघातून खेळणाऱ्या लिव्हिंगस्टोनची कामगिरी समाधानकारक झाली नव्हती.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) महालिलावाच्या रविवारी दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनने जोरदार मुसंडी मारत महागडय़ा खेळाडूंमध्ये चौथा क्रमांक मिळवला. पंजाब किंग्जने लिव्हिंगस्टोनसाठी ११ कोटी, ५० लाख रुपयांची आणि वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज ओडीन स्मिथसाठी सहा कोटी रुपयांची बोली लावली.गतहंगामात राजस्थान रॉयल्स संघातून खेळणाऱ्या लिव्हिंगस्टोनची कामगिरी समाधानकारक झाली नव्हती. परंतु १८ खेळाडूंचे आव्हान पेलण्याच्या इराद्याने लिलावाच्या पहिल्या सत्रात लिव्हिंगस्टोनसाठी पाच संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. भारताच्या दुसऱ्या फळीचे डावखुरे वेगवान गोलंदाज खलील अहमद आणि चेतन सकारिया यांना अनुक्रमे ५.२५ कोटी आणि ४.२० कोटी रुपयांना दिल्ली कॅपिटल्सने करारबद्ध केले. अन्य भारतीयांपैकी, षटकारांची क्षमता असलेल्या अष्टपैलू शिवम दुबेला चेन्नई सुपर किंग्जने चार कोटी रुपये रकमेला, तर विजय शंकरला गुजरात टायटन्सने १.४० कोटी रकमेला संघात स्थान दिले. चेन्नईने श्रीलंकेचा नवखा फिरकी गोलंदाज महेश तिकसानाला (७० लाख रुपये) संधी दिली आहे.

अजिंक्य रहाणेला कोलकाता नाइट रायडर्सने एक कोटी या मूळ रकमेतच प्राप्त केले आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत चमकणाऱ्या मार्को यान्सनला (४.२० कोटी) सनरायजर्स हैदराबादने संघात घेतले. दुखापतीतून सावरलेला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरसाठी मुंबई इंडियन्सने आठ कोटी रुपये मोजले आहेत. भारताचा अनुभवी यष्टीरक्षक वृद्धिमान साहाला दुसऱ्या प्रयत्नात न्याय मिळाला. चेन्नईवर कुरघोडी करीत गुजरात टायटन्सने साहाला (१.९० कोटी) संघात घेतले. गुजरातनेच डेव्हिड मिलरसाठी तीन कोटींची बोली लावली.

युवा ताऱ्यांचे संमिश्र दखल

एका आठवडय़ापूर्वीच भारताला पाचव्यांदा युवा विश्वचषक जिंकवून देणाऱ्या भारतीय संघातील बहुतांश खेळाडूंना रविवारी लिलावाच्या दुसऱ्या दिवशी उत्तम बोली लावण्यात आली. इंग्लंडविरुद्ध अंतिम फेरीत सामनावीर ठरलेल्या राज बावाला पंजाब किंग्जने दोन कोटी रुपयांत करारबद्ध केले. भारताचे विजयी नेतृत्व करणाऱ्या यश धूलसाठी दिल्ली कॅपिटल्सने ५० लाख रुपये मोजले. महाराष्ट्राचा वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगर्गेकर आगामी हंगामात महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसेल. चेन्नईने राजवर्धनवर १.५ कोटी रुपयांची बोली लावली. मात्र कौशल तांबे, विकी ओस्तवाल, वासू वत्स आणि हर्नूर सिंग यांच्यावर कोणीही बोली लावली नाही. त्याशिवाय २०२०च्या युवा विश्वचषकात खेळलेला मुंबईकर अष्टपैलू अथर्व अंकोलेकरलासुद्धा कोणत्याही संघाचा सहारा मिळाला नाही.

एडमिड्सचे पुनरागमन

लिलाव प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी कमी रक्तदाबामुळे खाली कोसळलेले लिलावकर्ते ह्युज एडमिड्स रविवारी अखेरच्या सत्रासाठी पुन्हा मंचावर परतले. यावेळी सर्वांनी त्यांचे उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. शनिवारी र्वांनदू हसरंगावर संघमालक बोली लावत असताना एडमिड्स अचानक चक्कर येऊन खाली पडल्याने लिलाव थांबवण्यात आला होता.

लिलावाविना!

एकीकडे काही खेळाडू कोट्यवधींची झेप घेत असताना भारतासह परदेशातील नामांकित खेळाडूंवर कोणाकडूनही बोली लावण्यात आली नाही. चेतेश्वर पुजारा, सुरेश रैना, केदार जाधव, स्टीव्ह स्मिथ, इशांत शर्मा, अमित मिश्रा, डेव्हिड मलान, तबरेझ शम्सी, रॉस्टन चेस, मार्नस लबूशेन, अ‍ॅडम झम्पा, ईऑन मॉर्गन, आरोन फिंच, शाकिब अल हसन यांसारखे नामांकित खेळाडू यंदा खेळताना दिसणार नाहीत.

‘आयपीएल’ लिलाव-२०२२ हे प्रथमच

मुंबई इंडियन्सने एखाद्या खेळाडूवर १० कोटींहून अधिक बोली लावली. गतवर्षी ९ कोटींची बोली लागलेल्या बिगरआंतरराष्ट्रीय कृष्णप्पा गौतमला यंदा फक्त ९० लाख रुपयांत लखनऊ संघाने करारबद्ध केले. ‘आयपीएल’च्या इतिहासात प्रथमच एखाद्या हंगामातील बिगर-आंतरराष्ट्रीय खेळाडूला पुढील हंगामात इतक्या कमी रुपयांत संघात शामील करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button