TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपुणे

नोंदणीकृत कामगारांना घरांसाठी पावणे पाच लाख रुपये निधी मिळणार: सुरेश खाडे

खाडे यांच्या हस्ते पुण्यात ‘प्राईड बेस्ट फॅसिलिटी’ पुरस्कारांचे वितरण

प्राईड बिल्डर्स एलएलपी’ने मिळविले विविध गटातील सर्वाधिक पुरस्कार


पुणे: ” कामगारांना घरे देण्यासाठी राज्य सरकारतर्फे प्रयत्न सुरू झाले असून, घरे बांधण्यासाठी मोकळ्या शासकीय जमिनींची माहिती देण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना देण्यात आले आहे. यासाठी खाजगी विकासकांचे देखील सहकार्य घेतले जाणार आहे. तसेच नोंदणीकृत कामगारांना घरासाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २.७५ लाख तर राज्याच्या कामगार मंत्रालयातर्फे २ लाख रुपये असा एकूण पावणे पाच लाख रुपये निधी कामगारांना घर घेण्यासाठी दिला जाणार आहे,’’ अशी माहिती राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिली.
क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे प्राईड ग्रुप आणि विलास जावडेकर डेव्हलपर्स यांच्या सहकार्याने देण्यात येणाऱ्या दुसऱ्या ‘प्राईड बेस्ट फॅसिलिटी’ पुरस्कारा’चे वितरण शुक्रवारी (दि.७ ऑक्टोबर) राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार माधुरी मिसाळ, पुण्याचे सहायक कामगार आयुक्त दत्ता दादासो पवार, क्रेडाई’चे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर, क्रेडाई महाराष्ट्र’चे अध्यक्ष सुनील फुरदे, क्रेडाई पुणे मेट्रो’चे अध्यक्ष अनिल फरांदे, उपाध्यक्ष रणजित नाईकनवरे, उपाध्यक्ष आदित्य जावडेकर, सचिव अरविंद जैन, कुशल आणि क्रेडाई पुणे मेट्रोच्या कामगार कल्याण समितीचे अध्यक्ष जे.पी. श्रॉफ, महासंचालक डॉ. डी के अभ्यंकर, कार्यक्रमाच्या समन्वयक सपना राठी, सह-समन्वयक पराग पाटील, मिलिंद तलाठी, समिती सदस्य कुणाल चुग, कुणाल बाठिया, मुकेश गडा उपस्थित होते.
शहरातील बांधकाम प्रकल्पांसाठी काम करणाऱ्या कामगारांच्या राहणीमानचा दर्जा उंचावण्यासाठी नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविणे, त्यांना चांगली वसाहत उपलब्ध करून देणे, स्वच्छ्ता प्रकल्पांची उभारणी, कौशल्य विकास तसेच कामगार सुरक्षेबाबत आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करत, कामगारांना चांगल्या सुविधा प्रदान करणाऱ्या सदस्य बांधकाम व्यावसायिक आणि त्यांच्या टीमला याप्रसंगी सन्मानित करण्यात आले. यावेळी प्राईड बिल्डर्स एलएलपी’ने विविध गटातील सर्वाधिक पुरस्कार मिळविले.
खाडे म्हणाले, ” करोनामुळे कामगारांना घरे उपलब्ध करून देण्याची गरज प्रकर्षाने जाणवली. यादृष्टीने प्रयत्न सुरू असून, या उपक्रमात खाजगी बांधकाम व्यावसायिकांनी ही सहभागी व्हावे. घरांसोबताच कामगारांसाठी प्रत्येक जिल्ह्यात ईएसआय रुग्णालय उपलब्ध करून देणे, कामगारांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक कामगार भवनाची उभारणी अशा विविध योजनांसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.”
मिसाळ म्हणाल्या, “ कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी आणि कामगार विमा योजनेशी जोडून घेता यावे यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु असून, त्यसाठी विकसकांनी पुढाकार घ्यावा.’’

सतीश मगर म्हणाले, “ बीओसीडब्ल्यु बोर्डाकडे १०,००० कोटी रुपयांचा निधी आहे. पण तो खर्च करण्यासाठी बोर्डाचे सदस्य आणि अधिकारी घाबरत असतात. कारण थोडी जरी चूक झाली, तरी लगेच चौकशीचा ससेमिरा सुरु होतो. हे चित्र बदलण्याची गरज आहे. तसेच बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी अपघात झाल्यास संबंधित प्रकल्पाच्या विकासकाला प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अपघात आणि दुर्लक्षामुळे झालेली चूक हे दोन वेगळे प्रकार करून बांधकाम व्यावसायिकांना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावे.”
सुनील फुरदे म्हणाले, “ महाराष्ट्रात पाच शहरांमध्ये लवकरच ही स्पर्धा राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर छोट्या शहरांमध्येही हा उपक्रम कसा राबविता येईल यासाठी प्रयत्न केले जाईल.’’
स्पर्धेबाबत माहिती देताना रणजित नाईकनवरे म्हणाले, “ बांधकाम कामगारांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने आम्ही दोन वर्षांपूर्वी ही स्पर्धा सुरू केली. यंदा स्पर्धेत एकूण ११८ बांधकाम व्यावसायिकांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेसाठी पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनीअरिंग अँड रिसर्च फाऊंडेशन या संस्थेने परीक्षक म्हणून काम केले. कौशल्य विकास, स्वच्छ्ता, सुरक्षेच्या मानकांचे पालन, मनोरंजन आणि क्रीडा, महिला सुरक्षा, शिक्षण अशा विविध निकषांच्या अधारे सुविधांची पाहणी करण्यात आली. सादरीकरण, प्रत्यक्ष पाहणी अशा विविध प्रक्रियेनंतर स्पर्धेच्या विजेत्यांची निवड करण्यात आली. बांधकाम कामगारांना पगाराव्यतिरिक्त इतर सुविधा दिल्यास कामगार महाराष्ट्रात काम करण्यास अधिक प्राधान्य देतील. त्याचा फायदा ग्राहकांनाही होईल आणि प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होईल.’’
जे पी श्रॉफ म्हणाले, “ क्रेडाई पुणे मेट्रो’तर्फे सुरु करण्यात आलेल्या ‘ बेस्ट फॅसिलिटी अवार्ड ‘ स्पर्धेला शहरातील बांधकाम व्यावसायिकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी चांगल्या सुविधा उभारल्या गेल्या आहेत. ही बदलाची एक सकारात्मक सुरवात आहे. हा बदल संपूर्ण महाराष्ट्र भर पोहचावा अशी आमची इच्छा असून, त्यासाठी राज्य शासनाने सहकार्य करावे अशी विनंती, आम्ही क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे खाडे यांना करत आहोत.’’

कार्यक्रमात क्रेडाई पुणे मेट्रोच्यावतीने अध्यक्ष अनिल फरांदे यांनी बांधकाम कामगारांच्या वसाहतीसाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, असे निवेदन खाडे यांना दिले.
कार्यक्रमात खाडे यांच्या हस्ते पाच बांधकाम कामगारांना ‘ सेफ्टी किट’ चे वितरण करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते क्रेडाई पुणे मेट्रोच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर बेलवलकर यांनी केले, तर आदित्य जावडेकर यांनी आभार मानले.
गटनिहाय विजेत्यांची नावे :

२१ ते १०० कामगार गटात पंचशील रियल्टी, ऋचा प्रमोटर डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड, मालपाणी ग्रुप यांना
रौप्य पुरस्कार, तर एस जे काँट्रक्टस प्रायव्हेट लिमिटेड यांना सुवर्ण पुरस्कार देण्यात आला. १०० ते ३०० कामगार गटात के. रहेजा कॉर्प, कीवेस्ट रियल्टी प्रायव्हेट लिमिटेड, के रहेजा कॉर्प यांना
रौप्य पुरस्कार तर एस जे काँट्रक्टस प्रायव्हेट लिमिटेड यांना सुवर्ण पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले. ३०० हून अधिक कामगार गटात पेगासस प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड यांना रौप्य पुरस्कार तर, प्राईड बिल्डर्स एल एल पी यांना २ वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी सुवर्ण पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्पर्धेच्या विशेष गटातील पुरस्कारांमध्ये प्राईड बिल्डर्स एल एल पी यांना सुरक्षा, आरोग्य आणि स्वच्छता, क्रेश फॅसिलिटी आणि नावीन्यता या गटात, सर्वाधिक बीओसीडब्ल्यू नोंदणीसाठी ट्रूस्पेस प्रॉपर्टीज आणि पेगासस प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड यांना कौशल्य विकास गटात रोहन बिल्डर्स अँड डेव्हलमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि एस जे काँट्रक्टस यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button