breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

शेतकऱ्यांचं हित पहायचं असेल तर किराणा दुकानांमध्ये वाइन विक्रीपेक्षा…; अण्णा हजारे संतापले

मुंबई |

महाराष्ट्र सरकारने नुकताच सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाइन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय दुर्दैवी आहे असेच म्हणावे लागेल, असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं आहे. एकीकडे राज्य सरकार हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतल्याचे सांगत आहे. तसेच वाईन म्हणजे दारू नाही असेही सांगण्यात येत आहे. असे निर्णय या राज्याला कुठे घेऊन जाणार हा खरा प्रश्न असल्याची टीका अण्णा हजारेंनी केलीय.

राज्य सरकारच्या निर्णयासंदर्भात आपलं मत व्यक्त करताना अण्णा हजारेंनी एक पत्रक जारी केलं आहेत. यामध्ये त्यांनी सरकारचे काम हे लोकांना व्यसनांपासून दूर नेण्याचं असलं पाहिजे असं म्हटलंय. “वास्तविक पाहता संविधानानुसार लोकांना व्यसनांपासून, अंमली पदार्थांपासून, मद्यापासून परावृत्त करणे, तसा प्रचार-प्रसार आणि लोकशिक्षण-लोकजागृती करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. असे असताना केवळ आर्थिक फायद्यासाठी मद्यपान आणि व्यसनाधीनतेला मोकळे रान करून देणारे निर्णय घेण्यात येत असल्याचे पाहून दुःख होते. शेतकऱ्यांचेच हित पहायचे असेल तर गोरगरीब, सामान्य शेतकरी आपल्या शेतात जे पिकवतो त्याला राज्य आणि केंद्र सरकारने हमीभाव द्यायला हवा. पण त्याकडे रीतसर दुर्लक्ष करून अशा प्रकारे वाइनची खुली विक्री करून एक वर्षात एक हजार कोटी लिटर वाइन विक्रीचे उद्दीष्ट ठेवणारे सरकार यातून नेमके काय साध्य करणार?,” असा प्रश्न अण्णा हजारेंनी उपस्थित केलाय.

“२० नोव्हेंबर २०२१ रोजी घेतलेल्या आणखी एका निर्णयात याच सरकारने आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क ३०० टक्क्यांवरून १५० टक्के केलेले आहे. उत्पादन शुल्कात ५० टक्के कपात करून हे मद्य स्वस्त करण्यात आले. यातून अडीच लाख बाटल्यांची विक्री वाढेल आणि सरकारला मिळणारा महसूल १०० कोटींवरून २५० कोटींवर जाईल असा विचार सरकारने केला असल्याचे समजते. याचाच अर्थ लोक व्यसनाधीन होऊन बरबाद झाले तरी चालतील पण सरकारचा महसूल वाढला पाहिजे असा अट्टाहास दिसून येतो,” असा टोला अण्णा हजारेंनी लगावलाय. “सरकारने घेतलेल्या वाइन विक्रीच्या निर्णयाचा राज्यातील जनता निषेध करीत आहे तर सरकारमधील लोक मात्र या निर्णयाचे समर्थन करीत आहेत. केवळ महसूल मिळतो म्हणून अशा प्रकारे मद्य विक्रीला रान मोकळे करून देण्यासाठी सरकारने प्राधान्य देणे हे या राज्यातील जनतेसाठी दुर्दैवी आहे,” असंही अण्णा हजारे म्हणालेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button