लाडक्या बहिणीनंतर मुलींसाठी सरकारची मोठी घोषणा
14 वर्षांपर्यंतच्या मुलींना कर्करोगाची मोफत लस

राष्ट्रीय : राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रचंड यशस्वी ठरली. या योजनेमुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आले. या योजनेत पात्र महिलांना 1500 रुपये महिन्याला दिले जात आहे. आता ही रक्कम वाढवून 2100 रुपये करण्यात येणार आहे. फडणवीस सरकारने मुलींसाठी आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कर्करोगाला रोखण्यासाठी 0 ते 14 वर्षे वयोगातील मुलींना मोफत कर्करोग प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यासंदर्भात माहिती दिली.
काय म्हणाले आरोग्य मंत्री?
पुण्यात बोलताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, बदलत्या जीवनशैलीमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कर्करोग होणारे रुग्ण वाढले आहेत. लहान मुलांनाही कर्करोग होत असल्याचे समोर आले आहे. ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे राज्यातील चौदा वर्षांपर्यंतच्या मुलींना एचपीव्हीची लस मोफत देण्यात येणार आहे. आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभागासह सर्व विभागांची मंजुरी घेऊन लसीकरण मोहीम सुरु करण्यात येणार आहे. एचपीव्ही लस मानवी पॅपिलोमाव्हायरस (HPV) पासून संरक्षण करते. ज्या विषाणूपासून विविध प्रकारचे कर्करोग होऊ शकतात.
हेही वाचा – विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी पुणे महापालिकेचा मोठा निर्णय !
महात्मा फुले योजनेचे पैसे रुग्णालयांना मिळाले नाही, त्यावर बोलताना प्रकाश आबिटकर म्हणाले, पुढच्या 8 दिवसांत महात्मा फुले आरोग्य योजनेतील पैसे सर्व रुग्णालयांना दिल्या जातील. अर्थ विभागाच्या काही तांत्रीक अडचणी होत्या त्या दूर करण्यात आल्या आहेत. शक्तीपीठ महामार्गाबद्दल दोन प्रकारचे मतमतांतर आहेत. या प्रकरणात शेतकऱ्यांचा असणारा आग्रह मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकला आहे, असे आबिटकर यांनी म्हटले आहे.