breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

शेकाप आमदाराच्या मध्यस्थीतून गोरठेकरांची ‘राष्ट्रवादी’त घरवापसी!

नांदेड |

सततच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे भाजपमध्ये आपली राजकीय चमक दाखवू न शकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष श्रीनिवास तथा बापूसाहेब गोरठेकर गुरुवारी पुन्हा ‘राष्ट्रवादी’च्या आश्रयाला गेले. विशेष म्हणजे त्यांची ही घरवापसी या पक्षाच्या नेत्यांच्या माध्यमातून नव्हे, तर शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या सहभागाने, प्रयत्नाने झाली. जिल्ह्यामध्ये सध्या भाजपचे खासदार व गोरठेकरांचे मानस बंधू प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसाची (२ ऑगस्ट) धामधूम सुरू असताना त्यांच्या ‘खास’ संबंधातल्या बापूसाहेबांनी गाजावाजा न करता, मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ‘राष्ट्रवादी’त प्रवेश केला.

वयाची सत्तरी ओलांडलेले गोरठेकर २००४ ते २००९ दरम्यान ‘राष्ट्रवादी’चे आमदार होते. नंतर २००९ ते २०१९ पर्यंत या पक्षाचे ते जिल्हाध्यक्ष होते आणि उमरी आणि धर्माबाद या दोन तालुक्यांत त्यांचे जबरदस्त राजकीय वर्चस्वही होते. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अशोक चव्हाण यांना झटका देत, भाजपच्या चिखलीकर यांना निवडून आणण्यात हातभार लावला. नंतरच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून या पक्षातर्फे भोकरमधून निवडणूक लढविली; पण अशोक चव्हाण यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. मागील काही महिन्यांत गोरठेकरांना वेगवेगळ्या दुखण्यांनी ग्रासले होते. हैदराबादेत दीर्घकाळ उपचार घेऊन ते बरे झाले तेव्हा त्यांना आणण्यासाठी स्वत: चिखलीकर हैदराबादी गेले होते.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या अलीकडच्या नांदेड दौऱ्यात गोरठेकरांनी त्यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. त्यानंतर भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत त्यांना स्थानही मिळाले. गेल्या आठवडय़ात औरंगाबादी झालेल्या भाजपच्या एका बैठकीला त्यांची उपस्थिती होती. त्यांचाही जन्मदिन नजीक आला असून त्यापूर्वी त्यांनी आमदार शिंदे यांच्या माध्यमातून ‘राष्ट्रवादी’त प्रवेश केल्यामुळे चिखलीकर गटाला धक्का बसल्याचे मानले जाते. गोरठेकरांचे चुलत बंधू अ?ॅड. वामनराव देशमुख यांनी महिनाभरापूर्वी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून ‘राष्ट्रवादी’त प्रवेश केला होता. पुढील काळात उमरी नगर पालिकेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे. ‘राष्ट्रवादी’चे जिल्हाध्यक्ष हरिहर भोसीकर बुधवारी औरंगाबादेत होते. गोरठेकरांचे ते खूप जुने मित्र तसेच जि.प.मधील जुने सहकारीही; पण आमदार  शिंदे यांनी जिल्हाध्यक्षांना थांगपत्ता लागू न देता, गोरठेकरांना चिखलीकरांपासून तोडत मूळ पक्षात आणून सोडल्याचे सांगण्यात येत आहे.  या घटनेनंतर श्यामसुंदर शिंदे यांच्याही पक्षांतराची चर्चा सुरू झाली आहे.  दरम्यान, गोरठेकरांच्या उमरीतील समर्थकांनी फटाके फोडून या नव्या राजकीय निर्णयाचे स्वागत केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button