TOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

महागाईत सामान्य होरपळले; पेट्रोल-डिझेल, गॅस, किराणा जबर महागले

देशात महागाईचा आगडोंब उसळला

नवी दिल्ली |  त्यात सामान्य जनता अक्षरशः होरपळली आहे. घरगुती वापराचा गॅस सिलिंडर आज ५० रुपयांनी महागला. पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही अनुक्रमे ८० आणि ७८ पैसे प्रति लिटर एवढी १३७ दिवसांनी वाढ झाली. त्याचा परिणाम सर्वच वस्तूंवर झाल्याने महागाई गगनाला भिडली आहे. किराणा मालाच्या दरातही १० ते १५ टक्के वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात १३० डॉलर्स बॅरल एवढी भरमसाठ वाढ झाली होती. ती आता १०० डॉलर्सपर्यंत कमी झाली आहे. परंतु इंडियन ऑइलने आज जवळपास साडेचार महिन्यांनी इंधन दरवाढ केली. त्यात पेट्रोल ८० पैसे आणि डिझेल ७८ पैसे प्रति लिटर महागले आहे. या दरवाढीमुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल ११० रुपये ८२ पैसे, तर डिझेल ९५ रुपये लिटर झाले आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल ९६ रुपये २१ पैसे आणि डिझेल ८७ रुपये ४७ पैसे लिटर झाले आहे. चेन्नईत पेट्रोल १०२ रुपये १६ पैसे आणि डिझेल ९२ रुपये १९ पैसे, बंगळुरूत पेट्रोल १०१ रुपये ४२ पैसे आणि डिझेल ९२ रुपये १९ पैसे, कोलकात्यात पेट्रोल १०५ रुपये ५१ पैसे आणि डिझेल ९० रुपये ६५ पैसे लिटर झाले आहे. पाच राज्यांतील निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर तब्बल १३७ दिवसांनी आज पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली आहे.

याशिवाय घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरातही आज ५० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे मुंबई आणि दिल्लीत गॅस सिलिंडर ९४९ रुपये ५० पैसे झाला आहे. यापूर्वी हा गॅस सिलिंडर ८९९ रुपये ५० पैसे होता. तर यापूर्वी ६ ऑक्टोबर २०२१ मध्ये गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली होती. आजच्या दरवाढीमुळे कोलकाता येथे नागरिकांना गॅस सिलिंडरसाठी ९७६ रुपये आणि चेन्नईत ९८७ रुपये ५० पैसे मोजावे लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करावी लागली, असे तेल कंपन्यांनी म्हटले आहे. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धही याला कारणीभूत आहे. इंधन आणि गॅस दरवाढीचा परिणाम इतर सर्वच वस्तूंवर झाला आहे. यामुळे वाहतूक खर्च वाढल्याने किराणा माल १० ते १५ टक्क्यांनी महागला आहे. खाद्यतेलाच्या दरातही भरमसाठ वाढ झाली आहे. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. तेल, डाळी, कडधान्य आणि धान्य अगोदरच महागल्यामुळे बेजार झालेल्या सामान्यांचे जगणे यामुळे आता अवघड झाले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button