ताज्या घडामोडीमुंबई

अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणाऱ्या;पालकांविरोधात गुन्हा.

ठाणे  |  ठाणे शहरात अनेक अल्पवयीन मुलांकडून वाहने चालविली जात आहेत. याप्रकारावर आळा घालण्यासाठी येत्या आठवडय़ाभरापासून ठाणे वाहतूक पोलिसांनी अशी अल्पवयीन मुले आणि त्यांच्या पालक किंवा ज्या व्यक्तीच्या नावाने वाहन आहे. त्या वाहन मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

गेल्या चार दिवसांपासून ठाणे वाहतूक नियंत्रण पोलिसांनी अशा काही अल्पवयीन चालकांची वाहने जप्त करून त्यांच्या पालकांचे १५ ते २० मिनिटांसाठी समुपदेशन केले आहे. या चार दिवसांत ठाणे पोलिसांनी १५ हून अधिक पालकांचे समुपदेशन केले आहे. तसेच त्यांना प्रत्येकी १० हजार रुपये दंडही आकारला आहे.

येत्या आठवडय़ाभरात समुदेशन करण्याऐवजी थेट गुन्हे दाखल करण्यात येतील अशी माहिती पोलिसांनी दिली. गुन्हे दाखल झाल्यास या मुलांच्या नोकरी किंवा महाविद्यालयांतील प्रवेशामध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे मुलगा अल्पवयीन असल्यास तसेच त्याच्याकडे वाहन परवाना नसल्यास त्याला वाहन चालविण्यास देऊ नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ठाणे जिल्ह्यात दरवर्षी २०० हून अधिक नागरिकांना अपघातात जीव गमवावा लागतो. यातील बहुतांश मृत्यू हे दुचाकीस्वारांचे होत आहेत. नियमानुसार १८ वर्ष पूर्ण झालेल्या वाहन चालकास वाहन परवाना मिळत असतो. १८ वर्षे पूर्ण नसल्यास संबंधित वाहन मालक आणि अल्पवयीन चालकाविरोधात मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाते. असे असतानाही काही पालक अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यासाठी देत असतात. त्यामुळे या मुलांसोबत इतर वाहन चालकांच्याही जीवाला धोका असतो. काही दिवसांपूर्वीच एका १७ वर्षीय मुलाने त्याच्या दुचाकीवर त्याच्या पाच मित्रांना घेऊन दुचाकी चालविल्याचा प्रकार मुंब्रा भागात उघडकीस आला होता. या घटनेनंतर त्यांच्या पालकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

गेल्या चार दिवसांत पोलिसांनी अल्पवयीन चालकांना अडवून त्यांची वाहने जप्त केली आहे. तसेच त्यांच्या पालकांना पोलीस चौकीमध्ये बोलावून त्यांचे समुपदेशन केले जात आहे. यातील अनेक पालकांनी मुलगा स्वत:हून दुचाकीची किल्ली घेऊन जात असल्याचे सांगितले. नियमांचे उल्लंघन केल्यास काय कारवाई होऊ शकते याची माहिती पोलिसांनी पालकांना दिली. तसेच गुन्हा दाखल झाल्यास मुलांना भविष्यात नोकऱ्याही मिळणे कठीण होणार असल्याचे पालकांना समजावून सांगितले. पुन्हा नियमभंग करणार नाही अशी हमी घेऊन या पालकांवर पोलिसांनी १० हजार रुपये दंडात्मक कारवाई केली आहे.

येत्या आठवडय़ापासून कारवाई आणखी कठोर होणार असून वाहनाचे मालक आणि अल्पवयीन वाहन चालक या दोघांविरोधात गुन्हे दाखल केले जाणार आहेत. तसेच दोघांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल. गुन्हे दाखल झाल्यास वाहन मालकाची रवानगी कारागृहात होण्याची शक्यता आहे. – बाळासाहेब पाटील, उपायुक्त, ठाणे वाहतूक नियंत्रण शाखा.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button