ताज्या घडामोडीमुंबई

मुंबई महापालिकेत तब्बल २३ हजार पदे रिक्त!, कंत्राटी कामगारांवर भिस्त

मुंबई | मुंबई महापालिकेने सलग दोन वर्षे करोनाचा मुकाबला केला असला, तरीही रिक्त पदांमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होताना दिसत नाही. मुंबई पालिकेत अत्याधुनिकीकरण, नवीन तंत्रज्ञान, कंत्राटी पद्धतीने उपलब्ध मनुष्यबळात नियमित कामांचा गाडा ओढला जात आहे. मात्र, पालिकेतील एकूण पदे आणि प्रत्यक्ष मनुष्यबळाची पडताळणी केल्यास रिक्त पदे अधिक आहेत. मुंबई पालिकेत एका लाख २० हजार पदे मंजूर असून, नियमित भरती आणि कंत्राटी पद्धतीने आस्थापना अनुसूचीवर प्रत्यक्ष कार्यरत पदे ९७ हजार आहेत. त्यामुळे सध्या सुमारे २३ हजार पदे रिक्त आहेत.

मुंबई पालिकेत रिक्त पदांमुळे पालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. पालिकेच्या आस्थापना अनुसूचीप्रमाणे प्रशासकीय अधिकारी संवर्गाची एकूण ३४८ पदे असून, त्यातील २५ पदे (७ टक्के), मुख्य लिपिक संवर्गातील एकूण १,२८० पदांपैकी २१३ पदे (१७ टक्के) पदे रिक्त आहेत. त्यामुळे पालिकेच्या दैनंदिन कामकाजासह आस्थापना, प्रशासकीय कामकाज खोळंबत असल्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

मुंबई पालिकेत अनेक वर्षे विविध विभागातील पदे रिक्त असून, ती भरली जात नाहीत. त्याचा परिणाम मुंबईकरांना मिळणाऱ्या सेवांवरही होत असल्याचे कामगार संघटनांचे म्हणणे आहे. पालिका प्रशासनाने ही पदे भरण्याचे आश्वासन दिले असले, तरीही त्याची पूर्तता होत नसल्याचा आक्षेप कामगार संघटनांचा आहे. १४ ऑक्टोबर २०२१मध्ये लिपिक वर्गातील सुमारे १,७०० पदे भरण्याचे आश्वासन प्रशासनाशी झालेल्या चर्चेत देण्यात आले होते. परंतु, सहा महिने उलटले तरीही त्याची पूर्तता न झाल्याचे ‘द म्युनिसिपल युनियन’चे सरचिटणीस रमाकांत बने यांनी सांगितले.

कंत्राटीकरणामुळे दुर्लक्ष?

सन १९९०च्या दशकात मुंबई पालिकेत एक लाख ४७ हजार पदे होती. मात्र, ही पदे हळूहळू कमी होत गेल्याने आता ही संख्या सुमारे एक लाख २० हजारांपर्यंत आली आहे. त्यामुळे तत्कालीन कालावधीची तुलना केल्यास ही संख्या आणखी वाढत जाईल, असे कामगार संघटनांचे म्हणणे आहे. सध्या रिक्त असलेली पदे केव्हा भरली जाणार, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच, कंत्राटीकरणावर भर दिला जात असल्याने कायमस्वरूपी पदांच्या भरतीकडे दुर्लक्ष होत असल्याचाही आक्षेप घेतला जात आहे.

घनकचरा विभागातील रिक्त पदे

सफाई कामगार : ५० पेक्षा जास्त जागा रिक्त. त्यात वारसाहक्क नोकरी प्रकरणे प्रलंबित असल्याने ही पदे रिक्त आहेत.

मुकादम : ९० ते १०० जागा रिक्त.

प्रतिवेदन वाहक : ४ जागा रिक्त.

उपद्रव शोधक : ९८ जागा रिक्त आणि आगार परिचर: ३० जागा रिक्त (दोन्ही पदे १० वर्षांपेक्षा अधिक वर्षे रिक्त)

चाळ राखणदार – १२ जागा रिक्त.

लिपिक पदे – घन कचरा व्यवस्थापन खात्यात १०० पेक्षा जास्त लिपिक पदे रिक्त असल्याने सफाई कामगारांकडून लिपिक पदाचे काम करून घेतले जात आहे. या विभागातील पदोन्नतीची प्रक्रिया प्रचलित पद्धतीने राबविल्यास सफाई कामगारांना २ ते ३ वर्षांनी पदोन्नतीची संधी असल्याचे ‘स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन’चे सरचिटणीस रवींद्र सूर्यवंशी यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button