breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

गणेशोत्सव-दहीहंडी निर्बंधमुक्त, मंडळांना सवलती, गणेशमूर्तींच्या उंचीवरही शिंदेंचा मोठा निर्णय

मुंबई : गेली दोन वर्ष कोरोनामुळे सर्व सणांवर निर्बंध आणि मर्यादा होत्या पण यावर्षी मात्र कोणत्याही सणांवर निर्बंध नसणार आहेत. गणेशोत्सव आणि दहीहंडीचा सण निर्बंधांविना दणक्यात साजरा होईल असं सांगतानाच गणेश मंडळांना नोंदणी शुल्कात सूट देण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतलेला आहे तसेच गणेशमूर्तींच्या उंचीवर कोणतंही बंधन नाही, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

आगामी गणेशोत्सव आणि दहीहंडी सणाच्या अनुषंगाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिंदे-फडणवीसांनी सणांच्या संदर्भाने घेतलेल्या निर्णयाची माहिती माध्यमांना दिली.

गणेश मंडळांना नोंदणी शुल्कात सूट, मूर्तीच्या उंचीवर कोणतंही बंधन नाही
मंडपाच्या परवानग्या सुटसुटीत करण्यात आल्या आहेत. एक खिडकी योजना आणि ऑनलाईन पद्धत करण्यात आलेली आहे, जेणेकरुन गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांना त्रास होणार नाही. तसेच मंडळांना नोंदणी शुल्क भरावे लागू नयेत, हमीपत्रही घेऊ नका असं पोलिसांना सांगितलं आहे. गणेश मूर्ती उंचीवरील मर्यादा काढून टाकली आहे तसेच विसर्जन घाटांवर दिव्यांची व्यवस्था आणि मूर्ती बनवण्यासाठी जागा उपलब्ध व्हाव्यात, ही मूर्तीकारांची मागणी देखील मान्य केली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसेच गणेश मूर्तीचं आगमन आणि विसर्जन मिरवणुका देखील दणक्यात करण्यास शासनाची परवानगी असेल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

यावर्षी सर्व मंडळांचा उत्साह आणि मर्यादा लक्षात घेऊन दहिहंडी, गणेशोत्सव आणि मोहरम उत्साहात साजरे झाले पाहिजेत. समाजप्रबोधन, ऐक्याचे दर्शन घडावे, यासाठी आपण सण साजरे करत असतो. पण सण साजरे करत असताना कायदा सुव्यवस्था राखली जावी. यासाठी पोलीस, जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. गणेशोत्सव आणि इतर सण सुरळीत पार पाडावे, आगमन-विसर्जन मार्गाची व्यवस्था, यंत्रणांना तातडीने दुरुस्तीच्या सूचना, कोणाची गैरसोय होऊ नये यासाठी आज पोलिस प्रशासनाला आवश्यक सूचना दिलेल्या आहेत. दहीहंडी साजरी करताना नियमांचं पालन करा. नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या. पोलिस प्रशासनाला सहकार्य करा. शेवटी नियमांचं पालन होऊन सण साजरे व्हावेत, अशी सरकारची अपेक्षा असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button