breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महाविकास आघाडीच्या छळामुळेच गजानन चिंचवडे यांचा बळी : माजी खासदार अमर साबळे

पिंपरी । प्रतिनिधी
शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांनी अवघ्या सहा महिन्यांपूर्वी भाजपात प्रवेश केला. त्याचा राग मनात धरून राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेने त्यांच्यावर २९ वर्षांपूर्वी झालेल्या जमीन खरेदी प्रकरणात गुन्हा दाखल करायला लावला. त्याचा तणाव आल्याने तसेच मानसिक खच्चीकरण झाल्याने चिंचवडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. चिंचवडे यांच्या मृत्यूस महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असून, गुन्हा दाखल करण्यास भाग पाडणारे त्यांचे मारेकरी आहेत, असा आरोप भाजपाचे माजी खासदार अमर साबळे यांनी केला आहे.

गजानन चिंचवडे यांचे शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानंतर भाजपाच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी खासदार अमर साबळे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे, माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्यासह भाजपाचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
अमर साबळे म्हणाले की, नगरसेविका अश्विनी चिंचवडे व गजानन चिंचवडे यांच्यासह दहा जणांवर २५ जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला होता. हा व्यवहार सन १९७१ ते २०१८ दरम्यान वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे झाल्याचे पोलीस दप्तरी नोंद आहे. संबंधित व्यक्ती राष्ट्रवादीच्या आमदारांच्या निकटवर्ती असल्यामुळे या प्रकरणात पोलीस प्रशासनावर दबाव आणण्यात आला. पोलिसांनी चिंचवडे यांची उलट-सुलट चौकशी केली. तर काही अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. यामुळे चिंचवडे तणावामध्ये होते. त्याच तणावातून त्यांचे स्वास्थ्य बिघडले व त्यांची प्राणज्योत मालवली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर प्रशासकीय ताकद वापरून भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून रणनिती आखली जात आहे. पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले की, भोसरीतील नगरसेवक राजेंद्र लांडगे, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, माजी उपमहापौर केशव घोळवे व भाजपाचे नेते गजानन चिंचवडे यांच्या गुन्हा दाखल करून राष्ट्रवादीने निवडणुकीच्या तोंडावर राजकारण सुरू केले आहे. या सूडाच्या राजकारणात आणखी किती राजकीय बळी घेतले जणार? असा प्रश्नही ढाके यांनी यावेळी उपस्थित केला.

दोषींवर कारवाई करा : महापौर ढोरे
गजानन चिंचवडे हे शहरातील एक सच्चा कार्यकर्ता महणून शहरवासियांना परिचित होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या स्वास्थ्य बिघडले. शिवसेना सोडून भाजपामध्ये आल्यामुळे त्यांना कोंडीत पकडण्याची संधी राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेते शोधत होते. मात्र, अशा प्रकारे छळ करणे योग्य नाही. त्यांच्या मृत्यूला जबाबदार आहेत. त्यांच्यावर त्वरित कारवाई करा, अशी मागणी महापौर माई ढोरे यांनी यावेळी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button