Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र

११ व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे सुवर्ण कैलास पारितोषिक परज्या चित्रपटास प्रदान

छत्रपती संभाजीनगर : जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या अकराव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप समारंभ मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी भारतीय चित्रपट स्पर्धेतील मानाचे सुवर्ण कैलास पारितोषिक परज्या या चित्रपटास प्रदान करण्यात आले.

यावेळी, सुप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक व निर्माते आनंद एल. राय, ऑस्कर विजेता साऊंड डिझाईनर पद्मश्री रसूल पूकुट्टी, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, महोत्सव संचालक सुनील सुकथनकर, महोत्सवाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, दिग्दर्शक जयप्रद देसाई, दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत, फ्रिप्रेसी इंडिया ज्यूरी चेअरपर्सन सी.एस.व्यंकटेश्वरन, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, प्रोझोनचे केंद्र संचालक कमल सोनी, डॉ. शिव कदम व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना दिग्दर्शक आनंद एल. राय म्हणाले, आपल्या मनाला आवडते तेच करत जगणे म्हणजे खरे जगणे आहे. आपल्या प्रवासात यश आणि अपयश येत राहते मात्र, आपण त्या दोन्हींही भूमिकातून जात असताना शिकत राहणे आवश्यक असते. अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मी वारंवार येत राहीन; विशेषत: या महोत्सवातून जात असताना मी साऱ्या गोष्टी शिकून जात आहे.

एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम म्हणाले, अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव वर्षानुवर्षे वाढत असून हा आपला महोत्सव आता राष्ट्रीय पातळीवर चर्चिला जात आहे. यंदाच्या वर्षी अगदी कलकत्ता, दिल्ली, हैदराबाद, केरळ आणि चेन्नई अशा देशभरातील विविध भागातून रसिक प्रेक्षक या महोत्सवात सहभागी झाले आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून केवळ मनोरंजन न साधता शैक्षणिक, सामाजिक आणि एकंदरीतच आपली जीवनाबद्दलची समज वाढविण्यास मदत होत आहे.

यावेळी बोलताना संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल म्हणाले, या महोत्सवात मोठ्या प्रमाणात दिग्दर्शक सहभागी झाले आहेत. या महोत्सवात संपूर्ण जगभरातील चित्रपट दाखविण्यात आले. माणसाच्या हृदयाला स्पर्श करण्याची क्षमता चित्रपटात असते. या महोत्सवात समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी सहभागी झाली होती. सुवर्ण शालीवाहन हा पुरस्कार मराठी चित्रपटासाठी पुढच्या वर्षी पासून दिला जाणार आहे.

पुढे बोलताना ऑस्कर विजेता साऊंड डिझाईनर पद्मश्री रसूल पूकुट्टी म्हणाले, मराठवाड्यासारख्या भागामध्ये हा चित्रपट महोत्सव होत आहे, ही निश्चितपणे कौतुकास्पद बाब आहे. हा महोत्सव इतका यशस्वी होण्यामध्ये येथील प्रेक्षकांची महत्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. विषेशकरून येथील प्रेक्षक चित्रपटांवर प्रचंड प्रेम करणारे आहेत. मी या महोत्सवात दरवर्षी सहभागी होणार आहे.

या महोत्सवात चित्रपटप्रेमी रसिकांचा खूप मोठ्या प्रमाणावर सहभाग यावर्षी होता. या महोत्सवात खूप लोकांना भेटलो. चित्रपट सृष्टीत काम करणारे अनेक मान्यवर या महोत्सवात सामान्य प्रेक्षक म्हणून सहभागी झाले होते. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानतो, असे महोत्सव संचालक सुनील सुकथनकर यावेळी म्हणाले.

हेही वाचा – लाडक्या बहिणींना तीन महिन्यांचा थकीत हप्ता एकत्र मिळणार

महोत्सवाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले, आजच्या या समारोप समारंभात समाधानाची भावना आहेत. या महोत्सवात सहा दिग्दर्शक मिळून काम करीत आहेत. विशेषतः हे सगळे दिग्दर्शक आयोजक म्हणून काम करीत आहोत. दिवसेंदिवस या महोत्सवाचा परीघ वाढत आहे. देशभरातून प्रेक्षक या महोत्सवात सहभागी झाले होते. या महोत्सवाचे नाव आज देशभर पोहचले आहे.

एमजीएम वृत्तपत्र व जनसंवाद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांद्वारे तयार करण्यात आलेल्या ‘एमजीएम इंस्पायर’चे या न्यूजलेटरचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शिव कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन संयोजक नीलेश राऊत यांनी मानले.

११ व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील पारितोषिक विजेत्या चित्रपटांची/व्यक्तींची माहिती खालीलप्रमाणे आहेत.

भारतीय चित्रपट स्पर्धेतील विजेते :

१. सुवर्ण कैलास पारितोषिक (सर्वोत्त्कृष्ट भारतीय चित्रपट) : परज्या

दिग्दर्शक – महादेव हडपड

स्वरूप : १ लक्ष रुपये आणि सुवर्ण कैलास स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र

२. रौप्य कैलास पारितोषिक (सर्वोत्त्कृष्ट अभिनेता ) : प्रज्वल कोल्लाळ

चित्रपट: परज्या

स्वरूप : २५००० रुपये आणि रौप्य कैलास स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र

३. रौप्य कैलास पारितोषिक (सर्वोत्त्कृष्ट अभिनेत्री ) : नाझ शेख

चित्रपट: सॉंग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज

स्वरूप : २५००० रुपये आणि रौप्य कैलास स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र

४. रौप्य कैलास पारितोषिक (सर्वोत्त्कृष्ट पटकथा) : अनुपर्णा रॉय

चित्रपट: सॉंग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज

स्वरूप : २५००० रुपये आणि रौप्य कैलास स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र

५. स्पेशल ज्यूरी मेन्शन (चित्रपट ) : मॅगझिन

दिग्दर्शक: शुभम संजय शेवडे

६. स्पेशल ज्यूरी मेन्शन (चित्रपट) : सीक्रेट ऑफ अ माउंटन सर्पेंट

दिग्दर्शक: निधी सक्सेना

७. मराठवाडा शॉर्ट फिल्म स्पर्धा

बेस्ट फिल्म : मुक्ता – आर्टिकल २१ ए

दिग्दर्शक: सतीश धूताडमल

स्वरूप : २५००० रुपये आणि रौप्य कैलास स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र

८. मराठवाडा शॉर्ट फिल्म स्पर्धा – स्पेशल मेन्शन :

१) बयाण , दिग्दर्शक : आकाश वाहतुळे

२) सुलतान, दिग्दर्शक : अविनाश कंबीकर

९. एमजीएम शॉर्ट फिल्म स्पर्धा (बेस्ट शॉर्ट फिल्म ) : निर्वाण

दिग्दर्शक: कान्हा चेतना ज्ञानेश्वर

स्वरूप : २५००० रुपये आणि रौप्य कैलास स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र

१०. फ्रिप्रेसी इंडिया अवॉर्ड (सर्वोत्त्कृष्ट चित्रपट ) : सॉंग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज

दिग्दर्शक – अनुपर्णा रॉय

११. स्पेशल मेन्शन (चित्रपट) : सायलंट रिबेलियन

दिग्दर्शक : मारी-एल्सा स्क्वाल्डो

१२. ऑडियन्स चॉईस अवॉर्ड (सर्वोत्त्कृष्ट चित्रपट ) : साबर बोंडं

दिग्दर्शक: रोहन कानवडे

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button