‘ज्ञानरथाचा सारथी हरपला’; अजितदादांच्या आठवणीने पुणेकर शिक्षणतज्ज्ञ गहिवरले
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरात शोकसभा | शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा अश्रूंना फुटला बांध

पुणे : “राज्याच्या राजकारणातील आणि समाजकारणातील एक धडाकेबाज नेतृत्व, सामान्यांच्या मुलांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचवणारे ‘ज्ञानरथाचे सारथी’ अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे,” अशा भावना पुणे जिल्ह्यातील विविध शिक्षण संस्थांच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने आयोजित केलेल्या शोकसभेत दादांच्या आठवणींना उजाळा देताना अनेक दिग्गजांच्या अश्रूंचा बांध फुटला.
बालगंधर्व रंगमंदिरात शोकाकुल वातावरण
मराठवाडा मित्रमंडळाचे कार्यकारी अध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही शोकसभा पार पडली. यावेळी बोलताना जाधव म्हणाले की, “कामाचा माणूस हीच दादांची खरी ओळख होती. त्यांच्यासारखा शिस्तप्रिय आणि तत्पर नेता पुन्हा होणे नाही.” रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी यांनी दादांच्या दूरदृष्टीचे उदाहरण म्हणून बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचा उल्लेख केला, तर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष एस. के. जैन यांनी पिंपरी-चिंचवडच्या विकासातील दादांचे योगदान अधोरेखित केले.
आठवणी सांगताना दाटून आला कंठ
दादांनी कार्यकर्त्यांवर आणि संस्थाचालकांवर दाखवलेला विश्वास आणि दिलेली शाबासकीची थाप आठवून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदीप कदम यांना भर सभागृहात अश्रू अनावर झाले. हीच अवस्था इतर मान्यवरांचीही होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी दादांचा उल्लेख ‘महाराष्ट्राचे ब्रँड नेते’ असा केला. अर्थमंत्री म्हणून त्यांनी शिक्षणासाठी कायमच तिजोरीचे दार उघडे ठेवल्याचे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा – लाडक्या बहिणींना तीन महिन्यांचा थकीत हप्ता एकत्र मिळणार
अपूर्ण राहिलेले स्वप्न
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी एक भावूक आठवण सांगितली. “पवार कुटुंबीय ज्या शाळेत दहावीपर्यंत शिकले, ती शाळा आधुनिक दर्जाची करण्याचे दादांचे स्वप्न होते, जे दुर्दैवाने अपूर्ण राहिले,” असे त्यांनी सांगितले. प्रोग्रेसिव्ह शिक्षण संस्थेचे डॉ. गजानन एकबोटे आणि ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे यांनीही दादांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीचे किस्से सांगितले.
स्मृती जतन करण्याचा संकल्प
अजितदादांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी विविध संस्थांनी काही महत्त्वपूर्ण संकल्प सोडले आहेत दादांच्या नावाने स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणे. पुणे विद्यापीठात अध्यासन केंद्र सुरू करणे आणि सुवर्णपदक देणे. शालेय अभ्यासक्रमात त्यांच्या जीवनपटाचा समावेश करणे. त्यांच्या कार्याचे भव्य दालन (म्युझियम) उभारणे आणि वृक्षारोपण करणे.
या शोकसभेला अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत, राहुल कराड, डॉ. विवेक सावंत, आमदार चेतन तुपे, विलास लांडे, डॉ. अरुण अडसूळ यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो शिक्षणप्रेमी आणि पदाधिकारी उपस्थित होते. साहित्यिक वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले.




