मोशीतील शाळा बांधकाम परवानगीबाबत नगरसेविका अर्चना सस्ते आक्रमक!
शाळा उभारणी परवानगी प्रलंबित ठेवल्याबद्दल प्रशासनाला सभागृहात जाब

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
मोशी येथील प्रस्तावित शाळा इमारतीच्या बांधकाम परवानगीचा प्रश्न महिनोनमहिने प्रलंबित ठेवल्याबद्दल नगरसेविका अर्चना राजेश सस्ते पाटील यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत त्यांनी प्रशासनाला थेट जाब विचारत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणारी ही कार्यपद्धती असल्याचा गंभीर आरोप केला.
मोशी बोऱ्हाडेवाडी येथील प्रभाग क्रमांक २ मधील शाळेसाठी आरक्षित जागेवर नियमानुसार शाळा स्थापन करण्यात आली आहे. मात्र शाळा इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक असलेली परवानगी मिळावी यासाठी अनेक महिन्यांपूर्वी सादर करण्यात आलेली फाईल अद्याप मंजूर करण्यात आलेली नाही. ही फाईल केवळ एका विभागातून दुसऱ्या विभागात फिरवली जात असून त्यावर कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्याची तक्रार नगरसेविका अर्चना सस्ते यांनी सभागृहात केली.
हेही वाचा
‘महाईन्यूज’च्या मुख्य संपादकपदी अविनाश आदक, तर कार्यकारी संपादकपदी भाऊसाहेब कोकाटे यांची नियुक्ती!
या मुद्द्यावर सभागृहात तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत त्यांनी डॉ. विजय सूर्यवंशी तसेच रवी लांडगे यांना थेट जाब विचारला. प्रशासनाच्या संथ व दुर्लक्षपूर्ण कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या विलंबामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.
या आक्रमक भूमिकेमुळे मोशीतील शाळा बांधकामाचा मुद्दा सभागृहात चांगलाच गाजला असून आता पुढील पंधरा दिवसांमध्ये संबंधित बांधकाम परवानगीबाबत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहे. येत्या पंधरा दिवसांत नक्की काय कार्यवाही होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
शाळा उभारणीच्या परवानगीची फाईल महिनोनमहिने प्रलंबित ठेवणे म्हणजे थेट विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ आहे. जनतेने आम्हाला त्यांचे काम करण्यासाठी निवडून दिले आहे, पण प्रशासनाच्या दिरंगाईमुळे जर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न रखडत असेल तर हे योग्य नाही, आमचे नेते आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या हक्कांसाठी आणि सक्षम शिक्षण व्यवस्थेसाठी आमचा लढा अधिक ठाम आणि आक्रमक राहील.
– अर्चना राजेश सस्ते पाटील, नगरसेविका पिं. चिं. मनपा.





