‘महाईन्यूज’च्या मुख्य संपादकपदी अविनाश आदक, तर कार्यकारी संपादकपदी भाऊसाहेब कोकाटे यांची नियुक्ती!

पुणे | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील नामांकित डिजिटल न्यूज पोर्टल व ई-पेपर ‘महाईन्यूज’मध्ये महत्त्वपूर्ण संपादकीय बदल करण्यात आले असून, मुख्य संपादकपदी अविनाश आदक, तर कार्यकारी संपादकपदी भाऊसाहेब कोकाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी घोषणा ‘महाईन्यूज’चे संस्थापक, संपादक अधिकराव दिवे- पाटील यांनी केली आहे. त्यांनी दोन्ही संपादकांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
अविनाश आदक हे गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय असून, त्यांनी प्रिंट, डिजिटल व ई-पेपर माध्यमांतून सातत्याने प्रभावी कामगिरी केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते ‘महाईन्यूज’मध्ये कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘महाईन्यूज’ने विश्वासार्ह, निर्भीड आणि लोकहिताच्या पत्रकारितेची ओळख अधिक मजबूत केली. त्यांच्या अनुभव, अभ्यासू दृष्टीकोन आणि संघटनात्मक कौशल्यामुळे मुख्य संपादकपदाच्या माध्यमातून ‘महाईन्यूज’ला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा
आय आय बी एम कॉलेज चिखली येथे हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न!
कार्यकारी संपादकपदी नियुक्त झालेले भाऊसाहेब कोकाटे हे राज्यभरात नामांकित मुलाखतकार, व्याख्याते व निवेदक म्हणून परिचित आहेत. महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, अध्यात्मिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा व साहित्य क्षेत्रातील घडामोडींवर त्यांचा सखोल अभ्यास आहे. त्यांच्या वैचारिक मांडणीमुळे आणि परखड पत्रकारितेमुळे ‘महाईन्यूज’च्या आशयाला अधिक व्यापकता व सखोलता लाभणार आहे.
भाऊसाहेब कोकाटे यांनी कार्यकारी संपादकपदाची जबाबदारी स्वीकारल्याने ‘महाईन्यूज’च्या “लढाई सत्याची, लोकशाहीच्या हक्काची” या ब्रीदवाक्याला अधिक बळ मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. मुख्य संपादक अविनाश आदक आणि कार्यकारी संपादक भाऊसाहेब कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली ‘महाईन्यूज’ सत्य, निर्भीडता आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणारी पत्रकारिता अधिक प्रभावीपणे मांडेल, असा विश्वास वर्तविण्यात येत आहे.
“पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याचे माध्यम नसून समाजाचा आरसा आणि लोकशाहीचा पहारेकरी आहे. सत्य, निर्भीडता आणि लोकहित या मूल्यांशी कोणतीही तडजोड न करता वाचकांचा विश्वास जपणे, हीच माझी प्राथमिक जबाबदारी आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक क्षेत्रातील घडामोडींचे संतुलित, अभ्यासपूर्ण आणि वस्तुनिष्ठ मांडणीद्वारे सामान्य नागरिकांचा आवाज बुलंद करणे, हेच माझे ध्येय आहे. ‘लढाई सत्याची, लोकशाहीच्या हक्काची’ या ब्रीदवाक्याला कृतीतून अर्थ देत ‘महाईन्यूज’ला अधिक सक्षम, विश्वासार्ह आणि प्रभावी व्यासपीठ बनवण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने कार्य करीन.”
– भाऊसाहेब कोकाटे, कार्यकारी संपादक, ‘महाईन्यूज’, पुणे.





