सैफवरील हल्ल्यात एकापेक्षा अधिक लोकांचा हात असल्याचा संशय
मुंबई पोलीस खुकमोनी जहांगीर शेख नावाच्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

मुंबई : अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात रोज नवीन अपडेट समोर येत आहे. हल्लामध्ये एकापेक्षा अधिक जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. सैफ अली खानवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी शरीफुल इस्लामला अटक केली होती. ठाणे येथील आरोपीला अटक करण्यात आलं आहे. त्याचे वर्णन बांगलादेशचे नागरिक असं करण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.
सैफवर हल्ला केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बांगलादेशी नागरिक शरीफुल इस्लाम उर्फ विजय दास याला 19 जानेवारी रोजी ठाण्यातून अटक केली होती. त्याला 24 जानेवारी म्हणजेच शुक्रवारी वांद्रे न्यायालयात हजर करण्यात येणार होते.
मुंबई पोलीस अधिकाऱ्याच्या खबरीने दिलेली धक्कादायक माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्याने सांगितलं की, पोलिसांनी सैफवरील हल्ल्यात एकापेक्षा अधिक लोकांचा हात असल्याचा युक्तिवाद करून आरोपी शरीफुल इस्लामच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने प्रजासत्ताक दिन साजरा
आरोपी तपासात सहयोग करत नाही. हल्ल्यात वापरलेला चाकू स्वतः खरेदी केला होता का? या प्रश्नाचं उत्तर देखील आरोपीने अद्याप दिलेलं नाही. न्यायालयाने शरीफुलच्या पोलीस कोठडीत 29 जानेवारीपर्यंत वाढ केली होती. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्यानंतर आरोपी शरीफुल काही दिवस कोलकात्यातही राहिला होता. अशा परिस्थितीत या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक 26 जानेवारीला पश्चिम बंगालमध्ये पोहोचले आहे.
‘या’ व्यक्तीच्या शोधात पोलीस
सैफ अली खान हल्ला प्रकरणी मुंबई पोलीस खुकमोनी जहांगीर शेख नावाच्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. त्याच्यावर शरीफुलला सिमकार्ड पुरवल्याचा आरोप आहे. सध्या सर्वत्र सैफ अली खान प्रकरणाची चर्चा रंगली आहे. तर अभिनेत्याच्या कुटुंबात भीतीचं वातावरण असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
सैफ अली खान याने 24 जानेवारी रोजी घडलेल्या घटनेवर वक्तव्य केलं. अभिनेता म्हणाला, ‘आरोपीने 1 कोटी रुपयांची मागणी केली आणि स्टाफवर हल्ला केला. मी जेव्हा त्याला थांबण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने माझ्यावर देखील हल्ला केला. हल्लेखोर चाकूने वार करून पळून गेला…’ याप्रकरणी जवळपास 50 जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत.