‘रेडिओ हे अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचे सशक्त माध्यम’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : रेडिओचे महत्त्व पूर्वापासून असून आजही ते अबाधित आहे. रेडिओ हे अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचे सशक्त माध्यम आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेडिओचे महत्त्व अधोरेखित केले.
महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि आशा रेडिओ पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विविध रेडिओ वाहिन्यांच्या सहा रेडिओ जॉकींनी प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीद्वारे मुख्यमंत्र्यांनी आपल्या रेडिओवरील संगीत ऐकणे, गाणे लिहिणे आदी छंदाविषयी मनमोकळा संवाद साधला. आपल्या आयुष्यातील रेडिओविषयक प्रसंगांचे वर्णन त्यांनी संवादाद्वारे केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शीघ्र कविता करीत गाणेही गायले. यावेळी ते म्हणाले, ‘‘आमच्या लहानपणी दिवसाची सुरुवात सकाळी रेडिओ ऐकण्यापासून व्हायची. विविध भारती रेडिओ वाहिनीवर सकाळी येणारी गाणी अगदी न चुकता ऐकली जायची. त्यामुळे रेडिओशी लहानपणापासूनच जुळता आले. शासन दरबारी रेडिओ क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांसाठी काही तरी केले पाहिजे, हा विचार सातत्याने होता. या पुरस्कार सोहळा आयोजनातून त्याचे समाधान लाभत आहे.’’
जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून आयोजित महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि आशा रेडिओ पुरस्कार सोहळ्यात रेडिओ जॉकी सिद्धू, अक्की, अर्चना, ब्रजेश, भूषण, सपना भट यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. या कार्यक्रमाचे समन्वयन हेनल मेहता यांनी केले. कार्यक्रमास ज्येष्ठ गायिका महाराष्ट्र भूषण आशा भोसले, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, संचालक विभीषण चवरे उपस्थित होते.
संगीत हे मानवामध्ये संवेदनशीलता आणत असून तणावमुक्तीचे कार्य करते. प्रवासात किंवा तातडीच्या समस्या येऊन मनस्थिती बिघडत असल्यास हमखास संगीत ऐकावे. त्यामुळे मन शांत होऊन विचार क्षमता विकसित होते. रेडिओवर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांनी रेडिओवरील कार्यक्रमांना आपल्या जीवनाचा अविभाज्य भागही बनविले आहे. त्यामुळे रेडिओचे महत्त्व कधीही कमी होणार नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. रेडिओचे महत्त्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओळखून शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी ‘मन की बात’ कार्यक्रम सुरू केला. रेडिओ केवळ संगीत ऐकण्याचे साधन नाही, तर संवादाचेही माध्यम होऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले, अशा शब्दांत पुन्हा एकदा रेडिओचे महत्त्व मुख्यमंत्री फडणवीस यांनी विषद केले.
हेही वाचा – “नरेंद्र मोदी देशाची प्रमुख संपत्ती” ; शशी थरूर यांच्याकडून पंतप्रधानांची पुन्हा स्तुती
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड शेलार म्हणाले, ‘‘सांस्कृतिक प्रवासाची मोठी वाटचाल रेडिओच्या माध्यमातून झाली आहे. शासनाने या प्रवासाची दखल घेत पुरस्कार सुरू केले आहे. १९२३ मध्ये रेडिओ बॉम्बे नावाने रेडिओ वाहिनी सुरू झाली. रेडिओ क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्काराच्या माध्यमातून सन्मान करणारे महाराष्ट्र हे देशात पहिले राज्य आहे. कोविडकाळात जीवनाला उभारी देण्याचे काम रेडिओवरील संवादाद्वारे करण्यात आले. यावेळी या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचे महत्त्व लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील रेडिओ जॉकींशी संवादही साधला होता.’’ मराठी संस्कृती रेडिओ वाहिन्यांवरील कार्यक्रमांमधून समाजापर्यंत जावू देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी रेडिओ नसता तर मी नसते, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते आशा रेडिओ जीवन गौरव पुरस्कार २०२५ हा विश्वनाथ ओक यांना देण्यात आला. तसेच, आशा सर्वोत्कृष्ट पुरुष निवेदक पुरस्कार हा रेडिओ मिर्ची वाहिनीचे रेडिओ जॉकी जितूराज यांना, आशा सर्वोत्कृष्ट महिला निवेदक पुरस्कार हा रेड एफएम वाहिनीच्या रेडिओ जॉकी मल्लिशा यांना प्रदान करण्यात आला. तसेच आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ केंद्र पुरस्कार रेडिओ सिटी यांना, तर आशा सर्वोत्कृष्ट कम्युनिटी रेडिओ केंद्राचा पुरस्कार विकास भारती रेडिओ केंद्र नंदूरबार यांना प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे कार्यक्रमात १२ रेडिओ प्रकारात पुरस्कार देण्यात आले. राज्यात १६ रेडिओ वाहिन्या, ५८ कम्युनिटी रेडिओ वाहिन्या व ६० केंद्र अस्तित्वात आहेत.