Pooja Sawant Movie | लग्नानंतर पूजा सावंतचा ‘थ्रिलर’ धमाका! ‘सालबर्डी’मध्ये उलगडणार एका भयाण गावाचं रहस्य

Pooja Sawant Movie : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत लग्नानंतर पहिल्यांदाच एका अत्यंत वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘सालबर्डी’ या चित्रपटात ती एका निर्भीड पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून, या चित्रपटाचा थरारक टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील ‘ग्लॅमरस क्वीन’ पूजा सावंत सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. मात्र, आता पूजा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर नवा अवतार साकारण्यास सज्ज झाली आहे. तिचा आगामी चित्रपट ‘सालबर्डी’ एप्रिल महिन्यातच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा विषय आणि त्यातील तगडी स्टारकास्ट यामुळे हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
नेहमीच ग्लॅमरस भूमिकांमध्ये दिसणारी पूजा सावंत ‘सालबर्डी’ मध्ये एका रहस्याचा पाठलाग करताना दिसणार आहे. लग्नानंतरचा तिचा हा पहिलाच मोठा रिलीज असल्याने तिच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या चित्रपटात ती केवळ एक अभिनेत्री म्हणून नाही, तर एका दमदार पात्रात प्रेक्षकांसमोर येईल. नेहमी नाजूक आणि ग्लॅमरस भूमिका साकारणारी पूजा या चित्रपटात पी. आय. मनोरमा प्रधान या करारी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. या भूमिकेसाठी पूजाने विशेष मेहनत घेतली असून, तिचा वर्दीतला लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
हेही वाचा – सह्याद्रीच्या कुशीत रंगलेला ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२६’
या चित्रपटाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे याची स्टारकास्ट. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार भोजने, कसलेले अभिनेते शशांक शेंडे, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे आणि माधव अभ्यंकर यांसारखी दिग्गज मंडळी एकाच पडद्यावर दिसणार आहेत. ओंकार भोजनेची गंभीर आणि रहस्यमयी भूमिका पाहण्यासाठी त्याचे चाहते सोशल मीडियावर आतापासूनच कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. पूजा सावंत सोबतची ओंकारची ही पहिलीच भूमिका असणार आहे. ओंकार भोजने या चित्रपटात ‘उपसरपंच मुकिंदा थोरात’ ही महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आलीय.
‘सालबर्डी’ हे एका छोट्या गावाचे नाव आहे. या गावात काही विचित्र आणि भयानक घटना घडतात, ज्यामुळे संपूर्ण गाव दहशतीखाली वावरत असते. या भीतीमागचे सत्य काय आहे? कोणीतरी जाणीवपूर्वक हे घडवून आणत आहे की यामागे काही अलौकिक शक्ती आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा थरारक प्रवास म्हणजे हा चित्रपट. या घटनांमागचे सत्य शोधण्यासाठी पोलीस अधिकारी मनोरमा प्रधान कशा प्रकारे तपास करतात आणि त्या रहस्याचा उलगडा कसा होतो, हे पाहण्यासाठी आणखी थोडे दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी यांनी याआधी ‘गुल्हर’ सारखे वेगळे चित्रपट दिले आहेत. अजय गोगावले आणि जावेद अली, आनंदी जोशी यांनी गाण्यांना स्वरसाज चढवला आहे. ‘नेब्यूला फिल्म्स’ बॅनरखालील ‘सालबर्डी’ चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केलीय. ‘सालबर्डी’ १७ एप्रिलला भेटीला येणार आहे.
चित्रपटाचे छायांकन व संकलन सिद्धेश संतोष मोरे, पटकथा, संवाद रोहित शुक्रे, गुरु ठाकूर आणि मुकुंद भालेराव यांच्या गीतांना पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत, पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि आशीष पाटील यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते दीपक कुदळे पाटील असून, वेशभूषा प्रणिता चिंदगे, रंगभूषा श्रीनिवास मेनूगे आणि कलादिग्दर्शन प्रदीप गुरव यांचे आहे.





