मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणात अभिनेता डिनो मोरियाला ‘ईडी’चे समन्स
डिनो मोरियाच्या अचडणीत वाढ

मुंबई : मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणात अभिनेता डिनो मोरियासह ८ जणांना ‘ईडी’ने समन्स बजावले. ६५ कोटींच्या कथित गैरव्यवहारात ईडीची कारवाई सुरू आहे. डिनो मोरियासह आठ जणांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. मुंबई, कोची, त्रिशूर येथे १८ ठिकाणी छापे, रोकड, बँक खाती, डिमॅट अकाउंट, डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहे. दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणुकीअगोदरच मोठे काही तरी घडण्याचे संकेत कालच मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. हे प्रकरण ही त्याला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.
ईडीचा तपास वेगात
डिनो मोरिया व केतन कदम यांच्यात २०१९-२२ दरम्यान आर्थिक व्यवहार, मालमत्ता व पैशाच्या स्रोतांची चौकशी सुरू आहे. पालिकेच्या तीन अधिकार्यांसह पाच कंत्राटदार, तीन मध्यस्थ व दोन कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्ह्यानंतर आता ईडीकडून आर्थिक गैरव्यवहार तपास वेगात असल्याची माहिती समोर येत आहे. ईडीने महाराष्ट्रासह केरळपर्यंत या प्रकरणाची पाळंमुळं खोदण्याचे काम सुरू केले आहे.
हेही वाचा – राज्य सरकार लवकरच ‘सीएसआर बोर्ड’ तयार करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
मिठी नदीची साफसफाई किंवा ‘desilting’ करण्यासाठी 2021–22 आणि 2022–23 या कालावधीत मुंबई महानगरपालिकेने जवळपास 65 कोटी रुपये खर्च केले होते. मुंबईला महापूराचा धोका होऊ नये, मुंबईत पाणी साचू नये हा यामागील उद्देश होता. पण पुढे तपासात असे पुढे आले की, प्रत्यक्षात कोणतीही नाले, नदी सफाई करण्यात आली नाही. या सफाईसाठी बिल, बनावट अहवाल सादर करण्यात आले. ड्रेजिंग उपकरणे भाड्याने घेताना त्यात अनियमितता करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला. या सर्व प्रकरणात कोट्यवधींचा मोठा घोटाळा झाल्याचा कथित आरोप आहे.
नितेश राणेंचे वक्तव्य चर्चेत
डिनो मोरिया प्रकरणावरून मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांचा मुलगा जेलची वारी करू शकतो अशी माहिती असल्याचा मोठा दावा राणे यांनी केला. डिनो मोरिया कोणासोबत बसायचा, कोणासोबत भावनिक आणि शारीरिक संबंध आहेत हे सगळ्यांना माहीत असल्याचा चिमटा राणे यांनी काढला.