अभिनेते रितेश देशमुख यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार

मुंबई : मनोरंजन, क्रीडा, सामाजिक कार्य, प्रशासन, उद्योजकता अशा विविध क्षेत्रांत महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करणारा ‘झी २४ तास’ वृत्तवाहिनीचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळा नुकताच यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला. महाराष्ट्र गौरव पुरस्काराच्या यंदाच्या दुसऱ्या पर्वात अभिनेते रितेश देशमुख यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी ‘झी २४ तास’चे संपादक कमलेश सुतार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खास मुलाखत घेतली. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, एस्सेल/झी समूहाचे अध्यक्ष आणि मार्गदर्शक डॉ. सुभाष चंद्रा, महाराष्ट्र शासनाचे आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, तसेच पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलगुरू आणि कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा – भेसळीच्या नमुने तपासणी बाबत तुकाराम मुंढे यांची मोठी घोषणा
‘महाराष्ट्र हे नेहमीच विविध क्षेत्रांतील असामान्य प्रतिभा, नवकल्पना आणि नेतृत्वाचे केंद्र राहिले आहे. ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कारां’सारखे उपक्रम समाजावर सकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या आणि राज्याच्या प्रगतीला बळकटी देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात’, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुरस्कार सोहळ्याचे कौतुक केले. तर अशा पुरस्कारांमुळे विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्यांना उत्कृष्टतेसाठी प्रेरणा मिळते आणि पुढील पिढ्यांनाही प्रेरित करण्याचे काम होते, अशी भावना रितेश देशमुख यांनी पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केली.
यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री गिरिजा ओक- गोडबोले, अभिनेते सचिन कुमावत आणि कंटेट क्रिएटर सिद्धेश लोकरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव करण्यात आला. तसेच, अभिनेत्री आणि नृत्यांगना शर्वरी जमेनीस, अभिनेत्री हेमल इंगळे, अभिनेते अभिजित खांडकेकर आणि अभिनेता पुष्कर जोग यांनी कार्यक्रम सादर करत सोहळ्याची रंगत वाढवली.





