वाघनखे मुंबईत येणार! नोव्हेंबरपासून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात पाहण्याकरिता खुली

मुंबई : लंडन येथील व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट संग्रहालयातून महाराष्ट्रात तीन वर्षांच्या करारावर आणण्यात आलेली वाघनखे लवकरच मुंबईकरांना पाहता येणार आहेत. नोव्हेंबरपासून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात ती प्रदर्शनासाठी ठेवली जातील.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने लंडन येथून तीन वर्षांच्या करारावर ही वाघनखे जुलै, २०२४मध्ये महाराष्ट्रात आणण्यात आली होती. राज्यात ठिकठिकाणच्या संग्रहालयांमध्ये ती प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत.
लंडनमधील संग्रहालयाशी झालेल्या करारानुसार संबंधित संग्रहालयांचे अभिरक्षक आणि पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक यांच्यावर वाघनखांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हा ऐतिहासिक ठेवा जपण्याकरिता विशेषत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना काळजी घेण्यात येत आहे.
आतापर्यंत नागपूर, सातारा येथे ती प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. सध्या कोल्हापूरच्या लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये वाघनखे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत. तेथून ती नोव्हेंबरमध्ये मुंबईत आणली जातील. त्याकरिता २० लाख रूपये खर्च येणार असून प्रदर्शनाकरिता छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ठेवली जातील.
हेही वाचा – अभिनेते रितेश देशमुख यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार
अफझलखानाचा वध करण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांनी या वाघनखांचा वापर केला होता, असा राज्य सरकारचा दावा आहे. तर इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी माहिती अधिकार आणि पत्रव्यवहाराद्वारे लंडनच्या संग्रहालयाकडून वाघनखांबाबत माहिती मिळविली होती. त्यात ही वाघनखे महाराजांची आहेत, याचा ऐतिहासिक पुरावा आमच्याकडे नाही, असे संग्रहालयाने स्पष्ट केले होते.
काही इतिहासकारांच्या मते, ब्रिटीशांनी साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह यांचे वंशज किंवा इतर मराठा सरदारांकडून गोळा केलेल्या वस्तू लंडनमधील संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. तर काहींच्या मते खरी वाघनखे साताऱ्याच्या संग्रहालयातच असावी.
माजी खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे यांनी ती भाडेतत्त्वावर आणण्याऐवजी महाराष्ट्रात कायमस्वरूपी आणण्याची मागणी केली होती.





