ताज्या घडामोडीमनोरंजन

‘सैराट २’ येणार का? नागराज मंजुळेंनी स्पष्टच सांगितलं..

Sairat 2 | २०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला होता. १०० कोटी रुपयांचा टप्पा पार करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता. आर्ची (रिंकू राजगुरू) आणि परशा (आकाश ठोसर) यांच्या प्रेमकथेतून ग्रामीण वास्तव आणि जातीय विषमता मांडणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. या चित्रपटाचा हिंदीत ‘धडक’ नावाचा रिमेक झाला होता. ‘धडक २’ नंतर आता ‘सैराट २’ येणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला असून, यावर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांचे स्पष्ट मत मांडले आहे.

चित्रपटातील लव्ह स्टोरीबद्दल बोलताना नागराज मंजुळे म्हणाले, “‘सैराट’ची गोष्ट लिहीत असताना माझ्या मनात विचार होता की, चित्रपटांमध्ये जसं प्रेमाचं जग दाखवलं जातं, ते वास्तवापेक्षा खूप वेगळं असतं. खऱ्या आयुष्यात प्रेमात असताना अनेक अडी-अडचणींचा सामना करावा लागतो. मला यामध्ये गरज नसताना नाट्यमयता आणण्याची गरज वाटली नाही आणि म्हणून मी आहे तसं वास्तव दाखवणारी गोष्ट ठेवली.” सहसा सगळ्या लव्ह स्टोरीचा शेवट ‘हॅपी एंडिंग’नं होतो असा समज असतो, पण खऱ्या समस्यांकडे आपण दुर्लक्ष करतो; त्यामुळे जे वास्तव आहे ते मांडणे हाच आपला दृष्टिकोन होता, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

फ्रान्स सेमी फायनलमध्ये; मोरोक्कोचा २-० ने पराभव करत एम्बापेची गोल्डन बूट शर्यतीत मेस्सीशी बरोबरी!

प्रसिद्ध चित्रपट निर्माते करण जोहर यांनी ‘सैराट’चा हिंदीत रिमेक केला होता. याबद्दल बोलताना नागराज म्हणाले, “सैराट या सिनेमाचा कधी बॉलीवूडमध्ये रिमेक होईल, असा मी विचारही केला नव्हता. मी फक्त माझा चित्रपट प्रामाणिकपणे बनवला. तो लोकांना किती आवडेल किंवा त्याचा रिमेक होईल का, याचा मी कधीच विचार केला नव्हता.”

‘सैराट २’ कधी येणार? नागराज मंजुळे यांनी दिले उत्तर

हिंदीत ‘धडक’चा सीक्वेल म्हणजेच ‘धडक २’ हा सिनेमा आल्यामुळे आता ‘सैराट २’ बनवणार का? या प्रश्नावर उत्तर देताना नागराज मंजुळे म्हणाले, “‘धडक’ सिनेमाचा सीक्वेल आलाय म्हणून ‘सैराट २’ आलाच पाहिजे, असं काही नाही. पण जर चांगली गोष्ट असेल, तरच ‘सैराट २’ येईल. ‘सैराट’मध्येच ती गोष्ट पूर्णपणे संपली होती.”

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, एखादा चित्रपट हिट झाला की त्या पात्रांचं पुढे काय झालं हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता असते. आज मला अनेक जण ‘फँड्री’च्या सीक्वेलबद्दलही विचारतात. ‘सैराट’ प्रदर्शित झाल्यानंतर लोक काही काळ विसरले होते, पण आता पुन्हा ‘सैराट २’ कधी येणार असे प्रश्न विचारत आहेत. मात्र, सध्या तरी ‘सैराट २’ वर कोणताही विचार केलेला नाही, असे नागराज मंजुळे यांनी स्पष्ट केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button