Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

फ्रान्स सेमी फायनलमध्ये; मोरोक्कोचा २-० ने पराभव करत एम्बापेची गोल्डन बूट शर्यतीत मेस्सीशी बरोबरी!

FIFA World Cup 2026 | स्टार स्ट्रायकर किलियन एम्बापेची उत्कृष्ट कामगिरी आणि उस्मान डेंबेलेच्या निर्णायक गोलच्या जोरावर बलाढ्य फ्रान्सने मोरोक्कोचा २-० असा पराभव केला आहे. या दणदणीत विजयासोबतच फ्रान्सने फिफा वर्ल्डकप २०२६ च्या सेमी फायनलमध्ये (उपांत्य फेरीत) दिमाखात धडक मारली आहे. बोस्टन येथील जिलेट स्टेडियमवर झालेल्या या चुरशीच्या लढतीत फ्रान्सने सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व राखले. विशेष म्हणजे, या सामन्यातील गोलसह फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बापेने चालू विश्वचषकात सर्वाधिक गोल करत गोल्डन बूटच्या शर्यतीत लिओनेल मेस्सीची बरोबरी केली आहे.

पहिल्या हाफमध्ये फ्रान्सचे प्रयत्न अपयशी; पेनल्टी हुकली

सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये फ्रान्सच्या संघाने आक्रमक खेळ करत तब्बल १३ वेळा गोल करण्याचे प्रयत्न केले, मात्र मोरोक्कोच्या बचावफळीमुळे त्यांना यश आले नाही. खेळाच्या २८ व्या मिनिटाला फ्रान्सला पेनल्टीची सुवर्णसंधी मिळाली होती. मोरोक्कोच्या नुसैर माझराउईने एम्बापेला डी-बॉक्समध्ये पाडल्यामुळे पंचांनी फ्रान्सला ही पेनल्टी बहाल केली. मात्र, व्हीएआर (VAR) तपासणीमुळे खेळ सुमारे तीन मिनिटे थांबला आणि त्यानंतर एम्बापेने मारलेली पेनल्टी मोरोक्कोचा गोलकीपर यासिन बोनोने सहज अडवली. यामुळे पहिला हाफ ०-० असा बरोबरीत सुटला.

उत्तरार्धात एम्बापे-डेंबेलेची कमाल

दुसऱ्या हाफमध्ये (उत्तरार्धात) मोरोक्कोने आक्रमक सुरुवात केली खरी, पण फ्रान्सने गेमवर पुन्हा ताबा मिळवला. खेळाच्या ६० व्या मिनिटाला डेसिरे डोऊच्या सुरेख पासवर किलियन एम्बापेने शानदार मैदानी गोल करत फ्रान्सचे खाते उघडले आणि संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर अवघ्या ६ मिनिटांनी, म्हणजेच ६६ व्या मिनिटाला एम्बापेने दिलेल्या असिस्टवर (पासवर) उस्मान डेंबेलेने दुसरा गोल करत फ्रान्सची आघाडी २-० अशी मजबूत केली आणि मोरोक्कोला बॅकफूटवर ढकलले.

हेही वाचा

मोशी कचरा डेपो दुर्घटना: आयुक्तांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी साधला संवाद

मोरोक्कोचा ‘रिव्हेंज’चा प्रयत्न अपयशी

मोरोक्कोसाठी हा सामना चार वर्षांपूर्वी झालेल्या वर्ल्डकपच्या सेमी फायनलमधील पराभवाचा बदला (रिव्हेंज) घेण्याची मोठी संधी मानला जात होता. कारण त्यावेळीही फ्रान्सने मोरोक्कोला २-० नेच पराभूत केले होते. संपूर्ण सामन्यात मोरोक्कोकडे फ्रान्सइतकीच बॉल पझेशन (बॉलवर ताबा) होती, परंतु त्याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात त्यांचे स्ट्रायकर्स अपयशी ठरले.

सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात फ्रान्सचा डिफेंडर डॅयोट उपामेकानोचा क्लिअरन्स चुकला आणि बॉल फ्रान्सच्याच गोलपोस्टच्या दिशेने गेला होता, मात्र गोलकीपर माईक मेग्नॉनने अत्यंत सतर्कता दाखवत उत्कृष्ट सेव्ह केला आणि फ्रान्सला स्वबळावरील संकटातून वाचवले.

सेमी फायनलमध्ये कोणाशी लढत?

मोरोक्कोला नमवून सेमी फायनलमध्ये पोहोचलेला फ्रान्सचा संघ आता उपांत्य फेरीत ‘स्पेन विरुद्ध बेल्जियम’ यांच्यात होणाऱ्या क्वार्टरफायनल सामन्यातील विजेत्या संघाशी भिडणार आहे. हा हाय-व्होल्टेज सेमी फायनल सामना शुक्रवारी रात्री (भारतीय वेळेनुसार शनिवारी पहाटे १२:३० वाजता) खेळवला जाईल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button