breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

अनिल देशमुखांच्या घरांवर ‘ईडी’ची धाड; दोन मालमत्तांची अधिकाऱ्यांकडून झाडाझडती

मुंबई |

भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ईडीच्या रडारवर आलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील दोन मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. रविवारी (१८ जुलै) अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने छापा टाकला. सकाळी आठ वाजता ही कारवाई करण्यात आली. ईडीने आधीच देशमुखांची ४ कोटी २० लाखांची मालमत्ता जप्त केलेली असून, अंमलबजावणी संचलनालयाने काटोल आणि वडविहिरा येथील घरांची झाडाझडती सुरू केली आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलीस अधिकारी परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुली करण्यास सांगितले होते, असा आरोप केलेला आहे. आरोपानंतर अनिल देशमुख ईडीच्या रडावर आले. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ईडीकडून अनिल देशमुख यांची चौकशी केली जात असून, देशमुख यांची ४ कोटी २० लाख रुपयांची मालमत्ताही जप्त केलेली आहे. ईडीने पुन्हा एकदा देशमुख यांच्या नागपूरमधील दोन घरांवर धाडी टाकल्या आहेत. नागपूरमधील काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने रविवारी सकाळी साधारणतः आठ वाजताच्या सुमारास धाड टाकली. त्यानंतर दोन्ही घरांची झाडाझडती अधिकाऱ्यांकडून सुरू असून, कारवाईचं वृत्त पसरताच देशमुख यांच्या समर्थकांनी बंगल्याबाहेर मोठी गर्दी केली होती. यावेळी कारवाई विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली.

  • चार कोटी २० लाखांची संपत्ती जप्त करताना ईडीने काय सांगितलं?

ईडीनं १६ जुलै रोजी अनिल देशमुख यांची चार कोटी २० लाख रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आल्याची माहिती दिली होती. जप्त करण्यात आलेल्या ४ कोटी २० लाखांच्या मालमत्तेमध्ये त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी आरती देशमुख आणि प्रिमियर पोर्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संपत्तीचा समावेश आहे. यामध्ये वरळीतील १ कोटी ५४ लाख रुपयांचा फ्लॅट आणि २ कोटी ६७ लाख रुपये किंमतीची रायगडच्या उरणमधील जमीन यांचा समावेश आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्या मदतीने मुंबईतील बारचालकांकडून अवैधरीत्या ४ कोटी ७० लाख रुपये जमा केले. तसेच, दिल्लीतील एका बनावट कंपनीच्या माध्यमातून अनिल देशमुख यांनी ४ कोटी १८ लाख रुपये जमवले असून ते श्री साई शिक्षण संस्था या ट्रस्टमध्ये आल्याचं भासवलं, असं ईडीकडून सांगण्यात आलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button