breaking-newsराष्ट्रिय

स्मृती इराणी फेक न्यूजच्या बळी ?

शबरीमला मंदिर प्रवेशाचा मुद्दा देशभर गाजतो आहे. अशात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या वक्तव्यामुळे देशात नवा वाद सुरु झाला आहे. रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी न्याल का, असा प्रश्न स्मृती इराणी यांनी उपस्थित केला होता. यावरुन गहजब माजल्यानंतर इराणी यांनी यावर स्पष्टीकरण देण्याचाही प्रयत्न केला. परंतु, ज्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले त्या रेहाना फातिमाने शबरीमला मंदिरात जाताना आपल्याबरोबर सॅनिटरी नॅपकिन घेतल्याच नव्हत्या. रेहाना फातिमाबाबत समाजातील काही विशिष्ट गटातून ती जाणूनबुजून पसरवलेली अफवा होती, हे आता समोर आले आहे. विशेष म्हणजे स्मृती इराणी या ‘फेक न्यूज’ आणि अफवांच्या बळी पडल्याचे दिसते. जी गोष्ट झालीच नाही, त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया वादाचा केंद्रबिंदू ठरली.

सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला मंदिरात सर्वच वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचे आदेश दिले. त्यानंतर अनेक संघटनांनी रस्त्यावर उतरुन न्यायालयाच्या या निर्णयाचा विरोध केला. यात महिलांचाही पुढाकार होता. या सर्वांनी मंदिरात प्रवेश करणाऱ्या महिलांना रोखण्यासाठी आंदोलन केले. रेहाना फातिमा नावाच्या बीएसएनएलमधील एक महिला कर्मचारीने अयप्पा मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. फातिमाने ‘इरुमुडीक्केटू’बरोबर (देवाला अर्पण करण्याचे साहित्य) सॅनिटरी नॅपकिन घेतल्याची अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवण्यात आली. फातिमाने हा आरोप त्याचवेळी फेटाळला होता. केरळ भारतीय जनता पार्टीचे मुखपत्र असलेल्या ‘जनम टीव्ही’ने ही फेक न्यूज पसरवण्यात पुढाकार घेतला होता, असे ‘न्यूजलाँड्री’ या वेबसाइटने म्हटले आहे. याच फेक न्यूजच्या स्मृती इराणी बळी पडल्या. याची खातरजमा न करताच त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली.

मुंबईतील एका कार्यक्रमात शबरीमला मंदिरात प्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना स्मृती इराणी म्हणाल्या होत्या की, ‘तुम्ही मित्राच्या घरी रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स नेऊ शकत नाही तर मग देवाच्या मंदिरात तुम्ही जाताना त्या अवस्थेत कशा काय जाल? हाच तो फरक आहे. मला प्रार्थना करण्याचा अधिकार आहे. मला अपमान करण्याचा अधिकारी नाही.’ स्मृती इराणींना अशाप्रकारची तुलना करण्यासाठी अफवांवर विसंबून राहावे लागते हेच दुर्दैवी आहे.

महिलांच्या शबरीमला मंदिर प्रवेशाबाबत स्मृती इराणी यांच्या या वक्तव्यावर ‘गार्डियन’चे मायकल सफी यांनी टीका केली. इराणींनी मायकल यांच्या ट्विटवर आक्षेप घेत त्याला प्रत्युत्तर दिले. पण इराणींनी त्या महिलेने काय भाष्य केले आहे, हे न पाहता खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवल्याचे यावरुन दिसते.

‘न्यूजलाँड्री’शी बोलताना फातिमा म्हणाली की, मी १८ तारखेला कोची येथील एका दुकानातून २००० रुपयांचे पुजेचे साहित्य खरेदी केले. पाच किमी ट्रेकिंग करुन मंदिरापर्यंत जाऊनही मी अयप्पांना ते अर्पण करुन शकले नाही. मी परत येईपर्यंत ही अफवा पसरलीही होती. पम्पा सर्कलच्या पोलीस निरीक्षकांनी पोलीस अधीक्षक आणि छायाचित्रकारांसमक्ष माझ्याकडील पुजेचे साहित्य तपासले. यावेळी ही अफवा ‘जनम टीव्ही’ने पसरवल्याचा आरोप फातिमाने केला आहे.

जनम टीव्हीने फातिमाच्या मित्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले होते. फातिमा सातत्याने आपल्या मित्रांना पुजेच्या साहित्याबरोबर सॅनिटरी नॅपकिन घेऊन जात असल्याचे सांगत होती, असे जनम टीव्हीने आपल्या वृत्तात म्हटले होते.

दरम्यान, विजयन नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने छायाचित्रकारांच्या समक्ष स्वत: फातिमाचे पुजेचे साहित्य तपासल्याचे ‘न्यूजलाँड्री’ला सांगितले. आपल्या तपासणीत सॅनिटरी नॅपकिन आढळून आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जी गोष्ट घडलीच नाही. ज्याची फक्त अफवाच पसरली यावर केंद्रीय मंत्री असलेल्या स्मृती इराणी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरुन देशात वादळ उठले. अखेर स्मृती इराणी याही फेक न्यूजच्याच बळी पडल्याचे दिसून येते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button