breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपुणेमुंबईराष्ट्रिय

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील यांचा ‘व्यावसायिक गुणवत्ता’ पुरस्काराने गौरव

रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ द्वारे सन्मान : सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल

पुणे : डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र – कुलपती, राइज एन शाईन बायोटेक कंपनीच्या संस्थापक डॉ. भाग्यश्री पी. पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ द्वारे प्रतिष्ठित रोटरी यांच्या तर्फे व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

डॉ. भाग्यश्री पाटील यांच्या शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रातील अथक प्रयत्नांमुळे असंख्य लोकांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम झाला आहे. संस्थेच्या कुलपती या नात्याने शैक्षणिक सर्वोत्कृष्टता गाठण्यासाठी अथक प्रयत्नातून त्यांनी विद्यापीठाचा नावलौकिक वाढवला आहे. आज हे विद्यापीठ जगभरात प्रसिद्ध आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी त्यांना सर्वांगीणदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्या सदैव कार्यरत असतात. संशोधन, नवकल्पना, सर्वांगीण शिक्षण आणि विकासाला चालना देण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे शिक्षण क्षेत्रात नवे मापदंड स्थापन केले आहेत.

डॉ. भाग्यश्री पाटील यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देशातील वनस्पती जैवतंत्रज्ञानातील अग्रणी अशी राईज एन शाईन बायोटेक प्रा. लि. ही आघाडीची कंपनी उभी राहिली आहे. २००३ मध्ये त्यांनी या कंपनीची सुरुवात केली. या कंपनीने थेऊर आणि जवळपासच्या १० ते १२ गावांमधील एक हजार ग्रामीण महिलांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध केले आहे.

एक निरोगी राष्ट्र निर्माण करण्याच्या उद्देशाने डॉ. भाग्यश्री पाटील यांनी डीपीयू सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अवयव प्रत्यारोपण विभाग सुरू केला. त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली हा विभाग आज उत्कृष्ट अवयव प्रत्यारोपण केंद्र म्हणून विकसित झाला आहे. त्याचबरोबर डॉ. भाग्यश्री पाटील यांनी यशोदा मातृदुग्ध पेढी या अत्याधुनिक दूध बँकेची स्थापनाही केली आहे. हे स्तनपान व्यवस्थापन, प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र असून, अकाली जन्मलेल्या आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या बाळांसाठी दूध उपलब्ध करून देणारा पिंपरी चिंचवड परिसरातील हा अशा प्रकारचा पहिला उपक्रम आहे. सुरक्षित आणि निरोगी दुग्धदाते निर्माण करण्यावर त्यांचा भर आहे. हा एक अभिनव माता आणि बाल केंद्रित उपक्रम आहे.

या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. भाग्यश्री पाटील म्हणाल्या, ‘व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार’ हा मानाचा पुरस्कार मला मिळाला हा माझा सन्मान समजते. अतिशय नम्रतापूर्वक मी त्याचा स्वीकार करते. मला मानवजातीची सेवा करण्याची आणि लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वोच्च शक्तीप्रती कृतज्ञ आहे.” पाटील पुढे म्हणाल्या, “या पुरस्काराद्वारे माझ्या कामाची दखल घेतल्याबद्दल आणि कौतुक केल्याबद्दल रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१च्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन मंजू फडके, संचालक राजू सुब्रमणियन आणि रोटरी क्लबच्या सदस्यांची मी मनःपूर्वक आभारी आहे.”

डॉ. भाग्यश्री पाटील यांच्या सातत्यपूर्ण कार्यातून व्यावसायिक सेवा आणि सामाजिक उन्नतीसाठी त्यांची कटीबद्धता दिसून येते. रोटरी इंटरनॅशनल व्होकेशनल एक्सलन्स पुरस्कार त्यांच्या या उल्लेखनीय कार्याला मिळालेली ओळख आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button