breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“…मग आतापर्यंत तुम्ही काय झोपा काढत होता का?”; पडळकरांचा राज्य सरकारला संतप्त सवाल!

मुंबई |

आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज(शनिवार) स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांची भेट घेऊन, त्यांचे सांत्वन केले. यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. एमपीएससीबाबत राज्य सरकारचे धोरण सुस्पष्ट नाही. आता बैठका घेत आहात, म्हणजे तुमचं अजून धोरणच ठरलेलं नाही. मग आतापर्यंत तुम्ही काय झोपा काढत होता का? असा संतप्त सवाल देखील आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला यावेळी केला. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, “एमपीएससीला नियोजनबद्ध योजना द्यायला हवी. पूर्व, मुख्य परीक्षा, मुलाखत व शारिरीक चाचणी कधी होणार? आणि तुम्ही त्यांना नियुक्तीपत्र कधी देणार? तरच त्या मुलांना त्यानुसार नियोजन करता येईल.

जर तुम्ही दोन-तीन वर्षे पूर्व परीक्षाच घेणार नसाल आणि घेतली तरी तुम्ही ती सहा-सहा वेळा पुढे ढकलणार असाल, तर महाराष्ट्रातील या मुलांनी करायचं काय? सरकारचं आजही या क्षणापर्यंत एमपीएससीच्या बाबतीत कुठलंही धोरण सुस्पष्ट नाही. मला आजही सरकारला हे सांगायाचं आहे की, तुम्ही त्या ४१३ मुलांना नियुक्तीपत्र कधी देणार आहात, त्यामध्ये एसईबीसीची ४८ मुलं आहेत, त्यांचं तुम्ही काय करणार आहात? एसईबीसीला स्थगिती येण्या अगोदर तुम्ही त्यांना नियुक्तीपत्र द्या, अशी आमची मागणी होती. तुम्ही त्यांना नियुक्तीपत्र दिलं नाही, आता त्या ४८ जणांचं तुम्ही काय करणार आहात? ३६५ विद्यार्थी आहे त्यामध्ये ७२ विद्यार्थी मराठा आहेत, मग त्या गरीब मराठ्यांच्या मुलांना तुम्ही का नियुक्तीपत्र दिलं नाही?”

तसेच, “सभागृहात वारंवार आम्ही तुम्हाला यावर स्पष्ट भूमिका द्या, म्हटलं तर सरकार फिरावाफिरवीची उत्तर देतं. यातून मुलांनी नेमका काय बोध घ्यायचा? काल आंदोलन झालं त्यांना नियुक्तीपत्र कधी देणार आहात? ज्यांच्या मुलखती घ्यायच्या आहेत, त्या कधी घेणार आहात? हे सगळं सांगा. कशासाठी तुम्ही बैठका घेत आहात? काय कारण आहे तुम्ही बैठक घेण्याचं? म्हणजे तुमचं अजून धोरण ठरलेलं नाही. मग आतापर्यंत तुम्ही काय झोपा काढत होता का? आता मंगळवारी बैठक घेणार आहात तर. स्वप्निलाच मृत्यू होऊन आज किती दिवस झाले? त्या दिवशी तुम्ही केवळ असं व्हायला नाही पाहिजे…तसं व्हायला नाही पाहिजे.. असं बोलून दाखवलं. पण आज स्वप्निलच्या आई-वडिलांसोबत कोण आहे इथं? आता आम्ही भेटलो आणि निघून चाललो, पण पुढे काय? आज स्वप्निलच्या आई-वडिलांसमोर एवढे प्रश्न आहेत, घरासाठी कर्ज काढलय, पूजाचं लग्न करायचं आहे, तिचा नोकरीचा प्रश्न आहे. कोण याची जबाबदारी घेणार?” असे प्रश्न देखील यावेळी आमदार पडळकर यांनी राज्य सरकारला उद्देशून विचारले.

याचबरोबर “माझा मुलगा गेला पण दुसऱ्यांचा मुलगा जाऊ नये, इतकी चांगली भूमिका स्वप्निलच्या आई-वडिलांची आहे. तरी देखील राज्य सरकार जागं होत नाही. तरी देखील अजून बैठका सुरू किती बैठका तुम्ही घेणार आहात? यांचा सगळा चुकीचा कारभार आहे, सहा सदस्यांच्या एमपीएससीच्या समितीमध्ये दीड वर्ष झालं चार सदस्य सरकारने नियुक्त केलेले नाहीत. एमपीएससीच्या संदर्भात राज्य सरकारने एक खूप चांगलं धोरण राबवलं पाहिजे, यूपीएससीच्या धोरणावर हे धोरण असलं पाहिजे.” असंही आमदार पडळकर यांनी यावेळी सांगितलं.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यानं स्वप्निलने आत्महत्या केली. एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही २ वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्निल हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यासारख्या कारणांमुळेही स्वप्निलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने हे टोकाचं पाऊल उचललं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button