breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बोऱ्हाडेवाडीतील ‘ग्रीन झोन’ला महाविकास आघाडीचा खोडा : नगरसेविका सारिका बोऱ्हाडे

  • नगरसेवक वसंत बोराटे यांच्याकडून नागरिकांची दिशाभूल

पिंपरी । प्रतिनिधी
बोऱ्हाडेवाडीतील ग्रीन झोनबाबतची फाईल गेल्या दोन वर्षांपासून राज्य सरकारच्या नगरसविकास विभागाकडे पडून आहे. महाविकास आघाडी सरकारने ग्रीन झोनची फाईल महापालिका प्रशासनाने सविस्तर प्रस्ताव दिला असतानाही मंजुरी दिली नाही. त्याविरोधात आवाज उठवण्याऐवजी नगरसेवक वसंत बोराटे राष्ट्रवादीच्या पंगतीला जावून बसले आहेत. ग्रीन झोनबाबत महाविकास आघाडीनेच खोडा घातला आहे, अशी टीका भाजपाच्या नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांनी केली आहे.

भाजपाचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी विकासकामे आणि ग्रीन झोनचा मुद्दा उपस्थित करीत आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बोऱ्हाडेवाडीतील ग्रीन झोनचा विषय चर्चेत आला आहे.याबाबत बोलताना नगरसेविका सारिका बोऱ्हाडे म्हणाल्या की, राज्यात भाजपाची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोऱ्हाडेवाडीतील ग्रीन झोनबाबत प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मात्र, नगरविकास खात्याने संबंधित शेतकऱ्यांना न कळवता त्यांच्या जागांवर आरक्षण वाढवली होती. रविशंकर स्कूल ते शिव रोड नव्याने २४ मीटर रस्ता प्रस्तावित केला होता. त्यामध्ये सुमारे १०० घरे स्वराज हाउसिंग सोसायटीमधील बाधित होत होती. त्यामुळे ४०० ते ५०० नागरिकांना बेघर होण्याची वेळ आली असती. विकास आराखड्यात आरक्षणे होती. त्यांचे क्षेत्र वाढवण्यात आले होते. त्यामुळे काही शेतकरी भूमिहीन होत होते. १८ मीटर रस्ता २४ मीटर केल्यामुळे शिवशंभू कॉलनीतील काही घरे बाधित होत होती. ही बाब आमदार महेश लांडगे यांच्या निदर्शनास आल्यानंतर पूर्वीचा ग्रीन झोन आम्ही रद्द केला. नव्याने प्रस्ताव करुन आम्ही महापालिका सर्वसाधारण सभेत मंजुरी घेतली. तो प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. मात्र, राज्याच्या नगरविकास मंत्रालयाकडून ही फाईल दुर्लक्षीत केली आहे. त्यामुळे बोऱ्हाडेवाडीतील ग्रीन झोनचा प्रश्न आतापर्यंत प्रलंबित आहे.

राज्यात २०१९ मध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली. त्याचवेळी विकासकामे आणि आरक्षणाचा मुद्दा पुढे करणाऱ्या वसंत बोराटे यांनी आता जशी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. तसेच विकासकामांसाठी राष्ट्रावादीच्या पंगतीत बसले असते, तर स्थानिक नागरिकांनी स्वागत केले असते. मात्र, निवडणूक आणि राजकीय महत्त्वाकांक्षा ठेवून बिनबुडाचे आरोप करीत बोराटे राजकीय स्टंटबाजी करीत आहेत, असा घणाघातही नगरसेविका बोऱ्हाडे यांनी केली आहे. निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडे पायघड्या घालणाऱ्या वसंत बोराटे यांनी आता ग्रीनझोनसाठी पाठपुरावा करावा, असा इशाराही नगरसेविका बोऱ्हाडे यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button