breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Coronavirus: १५ एप्रिलपर्यंत परदेशी पर्यटकांचे व्हिसा रद्द; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली | महाईन्यूज

कोरोना विषाणूचा फटका १०० हून अधिक देशांना बसल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं जगात महारोगराई पसरल्याचं घोषित केलं आहे. गेल्या काही दिवसांत भारतातल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानं केंद्र सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. केंद्र सरकारनं १५ एप्रिलपर्यंत सगळे व्हिसा रद्द केले आहे. परदेशातून येणाऱ्या व्यक्तींपासून होणारा संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र राजदूत, संयुक्त राष्ट्र, महत्त्वाच्या प्रकल्पांवरील अधिकाऱ्यांना यातून वगळण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

जगभरातून भारतात येणाऱ्या पर्यटकांचे व्हिसा १३ मार्चपासून (उद्या) रद्द होतील. १५ एप्रिलपर्यंत हा निर्णय लागू असेल. परदेशात राहणाऱ्या भारतीयांनाही या कालावधीत प्रवेश दिला जाणार नाही. जगभरात कोरोनाचा झालेला फैलाव आणि दुबई, अमेरिकेसह काही देशांतून परतलेल्या भारतीयांमध्ये दिसून आलेली कोरोनाची लक्षणं या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला. परदेशात राहणाऱ्या भारतीयांना (ओएसआय कार्डधारक) देशात व्हिसामुक्त प्रवास करता येतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनाही १५ एप्रिलपर्यंत भारतात येता येणार नाही.

१५ फेब्रुवारी २०२० नंतर भारतात दाखल झालेल्या चीन, इटली, इराण, कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीच्या नागरिकांना वेगळं ठेवण्यात येणार आहे. या देशांमधून आलेल्या भारतीय नागरिकांनादेखील किमान १५ दिवस वेगळं ठेवलं जाईल. भारतात येण्याच्या विचारात असलेल्या परदेशी नागरिकांना जवळच्या भारतीय दुतावासाशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गरज नसताना परदेशात जाऊ नका, शक्य असल्यास प्रवास टाळा, असं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलं आहे. कोरोनानं जगभरात थैमान घातल्यानं जागतिक आरोग्य संघटनेकडून बुधवारी महारोगराई घोषित करण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महारोगराई म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महारोगराई कधी पाहण्यात आली नाही. आगामी दिवस व आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण व मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button