TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मातोश्री वारीत दोन नगरसेवकांच्या अनुपस्थितीने संभ्रम ; भाजपच्या पूनम धनगर शिवसेनेत

नाशिक :  महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराला नव्याने सुरूवात झाली असून शिंदे गटाने फासे टाकल्यानंतर शिवसेनेने प्रतिशह देण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. त्या अंतर्गत भाजपच्या माजी नगरसेविका पूनम धनगर यांनी मातोश्री येथे सेनेत प्रवेश केला. माजी नगरसेवक प्रवीण तिदमे शिंदे गटात गेल्यानंतर सेनेच्या माजी नगरसेवकांनी शुक्रवारी मुंबईत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. मुंबई वारीत श्याम साबळे आणि कल्पना चुंबळे यांनी दांडी मारली. ते भाजप किंवा शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची साशंकता वर्तविली जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रवीण तिदमे यांच्याकडे महानगर प्रमुखपद सोपवत धक्का दिल्यानंतर शिवसेनेने तातडीने मातोश्री भेटीची आखणी केली. यामागे पक्षाशी एकनिष्ठ आणि संभाव्य फुटीर यांची शिरगणती करण्याचे नियोजन होते. सेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुनील बागूल, मनपातील माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवकांनी दुपारी मातोश्रीवर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी सुमारे ३० माजी नगरसेवक उपस्थित असल्याचे सांगितले जाते. मावळत्या महापालिकेत शिवसेनेचे ३३ नगरसेवक होते. या भेटीत श्याम साबळे आणि कल्पना चुंबळे हे अनुपस्थित होते. त्यांना निरोप दिले गेले होते. परंतु, काही अडचणींमुळे शक्य झाले नसेल. वैयक्तिक कारणामुळे ते आले नसतील, अशी शक्यता बडगुजर यांनी व्यक्त केली. यावेळी पंचवटी प्रभाग समितीच्या माजी सभापती, भाजपच्या माजी नगरसेविका पूनम धनगर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उध्दव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. महापौर निवडणुकीवेळी भाजपच्या १२ नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकावले होते. त्यात धनगर यांचाही समावेश होता. आगामी निवडणुकीत भाजप उमेदवारी देईल की नाही, याबद्दल त्यांना साशंकता होती. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यास धनगर यांनी दुजोरा दिला.

राज्यात शिवसेनेची सत्ता असताना काही महिन्यांपूर्वी भाजपचे माजी उपमहापौर प्रथमेश गिते, माजी उपमहापौर भिकुबाई बागूल, माजी नगरसेविका हेमलता कांडेकर, सुफी जीन यांनी शिवबंधन बांधले होते. अपक्ष माजी नगरसेवक मुशीर सय्यदही सेनेत दाखल झाले होते. राज्यातील सत्ता गेल्यानंतर शिवसेनेत फाटाफुट सुरू झाली आहे. या स्थितीत स्वपक्षीयांना एकत्र ठेवत भाजपच्या माजी नगरसेविकेला शिवसेनेत आणून विरोधकांना आव्हान देण्याची धडपड केली जात आहे.

उध्दव ठाकरेंचा एकसंघ राहण्याचा सल्ला
महानगरपालिकेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. एकसंघ राहून तयारीला लागा. जनमत शिवसेनेच्या बाजूने आहे. लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवसैनिकांनी नागरिकांमध्ये जाऊन त्यांची कामे करा. त्यांना विश्वास द्या, असा सल्ला पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पदाधिकारी, माजी नगरसेवकांना दिला. दसरा मेळाव्यात मार्गदर्शन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button