कामगाराच्या अंगावर पडले कंपनीतील क्रेन : कामगाराचा मृत्यू
पिंपरी l प्रतिनिधी
कंपनीतील क्रेन अंगावर पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 30) सकाळी दहा वाजता श्रीकॉन कंपनी तळवडे चौक येथे घडली.
मनीष दयाशंकर चौहान (वय 22, रा. देहूगाव) असे मृत्यू झालेल्या कामगारांचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे वडील दयाशंकर मुकध्वज चौहान (वय 53, रा. उत्तर प्रदेश) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चैतन बाळासाहेब जयगोंडे (रा. देहू आळंदी रोड, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मयत मुलगा मनीष हा तळवडे चौकातील श्रीकॉन कंपनीत मागील चार महिन्यांपासून हेल्पर म्हणून काम करत होता. रविवारी तो कामावर असताना कंपनीतील क्रेन तुटून अंगावर पडले. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद गेज्जेवार तपास करीत आहेत.