breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

चोक्सीला डोमिनिका कोर्टाकडून जामीन; भारताच्या प्रयत्नाला बसली खीळ

डोमिनिका – भारतातील पंजाब नॅशनल बँकेचे सुमारे १३ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला डोमिनिकाहून परत आणण्याच्या भारताच्या प्रयत्नाला खीळ बसली आहे. डोमिनिका हायकोर्टाने चोक्सीचा आरोग्याच्या कारणास्तव अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मेहुल चोक्सीने आरोग्याचे कारण सांगून डोमिनिका कोर्टात याचिका दाखल केली होती. काल सोमवारी कोर्टाने त्याला अंतरिम जामीन मंजूर केला. मेहुल चोक्सी प्रवास करण्यासाठी फिट असल्याचे जोपर्यंत दिसून येत नाही, तोपर्यंत त्याला जामीन देण्यात आला आहे.

यापूर्वी मेहुल चोक्सीने न्युरोलॉजिकल आजाराने ग्रस्त आहे आणि यावरील आजार डोमिनिकामध्ये उपलब्ध नसल्याच्या आधारावर जामीन याचिकेवर लवकर सुनावणी करण्यासाठी स्वतंत्र याचिका दाखल केली होती. याशिवाय त्याने या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी करण्याचा आग्रह केला होता. हा आग्रह हायकोर्टाने स्वीकारला होता. यापूर्वी या याचिकेवर २३ जुलै रोजी सुनावणी होणार होती.

मेहुल चोक्सी सध्या त्याच्या कथित अपहरण नाट्यामुळे चर्चेत आला होता. अँटीग्वामधून डोमिनिकाला गेलेल्या चोक्सीने आपल्याला भारतात परत नेण्यासाठी भारत सरकारने जबरदस्तीने डोमिनिकाला नेल्याचा आरोप केला होता. मात्र अँटीग्वा सरकार त्याला परत भारतात पाठविण्यासाठी तयार असल्याने त्याने स्वतःच आपल्या अपहरण नाट्याची कहाणी तयार केल्याची धक्कादायक माहिती भारतीय गुप्तचर स्रोतांनी उघडकीस आणली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button