छगन भुजबळांचं तेलगी घोटाळ्याप्रकरणी मोठं विधान; म्हणाले…

मुंबई : नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळ्याप्रकरणी मोठं विधान केलं आहे. माझी काहीच चूक नसताना माझा राजीनामा घेण्यात आला, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे.
छगन भुजबळ म्हणाले, तेलगी घोटाळ्यात माझी बदनामी झाली. वास्तविक मी गृहमंत्री असताना तेलगीला मोक्का लावला होता. त्याची सीबीआय चौकशी झाली. तेव्हा केंद्रात भाजपाचे सरकार होते. सीबीआयने दोन आरोपपत्रे दाखल केली, त्यात छगन भुजबळ हे नाव नव्हते. नंतर यूपीए सरकार आले, त्या वेळी एक आरोपपत्र दाखल झाले, त्यातही माझे नाव नव्हते. तरीही माझा मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात आला.
माझी काही चूक नसताना राजीनामा घेण्यात आला आणि माझ्या नावाची बदनामी झाली हे शल्य माझ्या मनात कायम आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून पाचव्या, पाचव्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर आलो. हे कशासाठी केले हा फक्त प्रश्न विचारला, त्यावर एवढे काहूर माजले. सगळे खूप रागावले, त्यामुळे यापुढे या विषयावर बोलायचे नाही, असे मी ठरवले आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.
हेही वाचा – ‘संभाजी भिडेंना कारागृहात चक्की पिसायला लावणार’; काँग्रेस नेत्याचं मोठं विधान
मी शिवसेना सोडली तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांची गोष्टच वेगळी होती. त्या वेळी मी कुठे कटू भूमिका घेतली होती? मी शांतच होतो. पण ते सारखे मला लखोबा, लखोबा म्हणायचे आणि ते व्यंगचित्र काढणे वगैरेतून वाद वाढत गेला. मग मी म्हटले की आपणही बोलायला पाहिजे. परंतु कुठए थांबायचे हे आम्हाला कळले. नंतर मी पुढे बाळासाहेबांवरील खटला मागे घेतला, बाळासाहेबांनीही मला सहकुटुंब जेवायला बोलावले, मिटले सगळे. आता मी शरद पवारांच्या विरोधात काही बोलत नाही. मी फक्त चार गोष्टी सांगितल्या, तुम्ही येवल्यात आलात, भुजबळांना विरोध, बीडमध्ये गेलात मुंडेंना विरोध, कोल्हापुरात गेलात मुश्रिफांना विरोध, बारामतीत गेलात, तिथे म्हणालात की अजित पवार आमचे नेते आहेत, हे बरोबर आहे का? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.