TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

बिग ब्रेकिंग ः दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर मुंबई पालिकेने दोन्ही गटांना परवानगी नाकारली

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याकरता शिवसेना आणि शिंदे गटाने परवानगी मागितली होती. दसरा मेळाव्याकरता दोन्ही गटामध्ये संघर्ष निर्माण होऊन रस्सीखेच सुरू होती. मात्र, मुंबई पालिकेने दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणं दोन्ही गटासाठी प्रतिष्ठेचा मुद्दा होता. त्यामुळे कोणाही एका गटाला परवानगी दिल्यास दुसऱ्या गटातील कार्यर्त्यांकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे पालिकेने दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. जी/ उत्तर विभाग कार्यालयाने शिवसेनेच्या उद्धव व शिंदे गटांना दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याबाबत परवानगी देण्यास नकार दिला आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर संपूर्ण शिवसेनाच हायजॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यावरही कब्जा केला होता. दसरा मेळावा घेण्यासाठी पालिकेची परवानगी मिळविण्यासाठी २२ ऑगस्ट रोजीच्या पालिकेच्या जी/ उत्तर विभाग कार्यालयाकडे अर्ज सादर केला होता. त्यानंतर शिंदे गटाने ३० ऑगस्ट रोजी दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच घेण्यासाठी परवानगी देण्याबाबतचा अर्ज जी/ उत्तर विभाग कार्यालयाला सादर केला होता.

नंतर शिवसेनेतर्फे पालिकेला दोन वेळा स्मरण पत्रही पाठविण्यात आली होती. परवा उद्धव ठाकरे गटातर्फे मिलिंद वैद्य यांनी स्वतः जी/ उत्तर कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांनी पालिका विधी खात्याकडून अभिप्राय मागविला असून तो आल्यानंतर परवानगीबाबत कळविण्यात येईल, असे जुजबी उत्तर देत उद्धव ठाकरे गटाची बोळवण केली होती. मात्र तरीही मिलिंद वैद्य यांनी, पालिकेकडून परवानगी मिळो अथवा न मिळो शिवसेनेचा मेळावा होणार म्हणजे होणारच, मात्र पक्षप्रमुख जेथे सांगतील तेथे हा मेळावा घेण्यात येईल, असे सांगितले होते. तर माजी महापौर व शिवसेना उद्धव गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी पालिका आयुक्त व सहाय्यक आयुक्त हे शिंदे गट व भाजप प्रणित राज्य सरकारच्या दबावाखाली असल्याने परवानगी देण्याबाबत जाणीवपुर्वक चालढकल करीत असल्याचा आरोप केला होता.

मात्र आता पालिका जी/ उत्तर विभाग कार्यालयाने पोलिसांच्या हवाल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याचे कारण देत दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता शिवसेना उद्धव गटाला व शिंदे गटाला शिवाजी पार्क मैदान पालिकेकडून मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.

दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच घेण्याचा उद्धव ठाकरेंचा निर्धार
शिवसेना पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, बुधवारी नेस्को मैदानावर घेतलेल्या शिवसेना गट प्रमुखांच्या मेळाव्यात यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच घेण्यात येईल, असा निर्धार व्यक्त केला होता.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button