‘ग्रामीण भागात उद्यमशीलतेच्या संधी निर्माण करणार’; विनायक भोंगाळे
शिक्षण विश्व : योगेश एंटरप्रायजेसतर्फे यशस्वी कॅम्पस ड्राइव्ह

पिंपरी चिंचवड : आपल्या जन्मभूमीतील मुलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे माझे कर्तव्य आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये सर्व आवश्यक कौशल्ये असतात. किंबहुना त्यांच्यात व्यवहारज्ञान अधिक असते. केवळ संधी न मिळाल्याने या मुलांना मागे राहावे लागते म्हणूनच ही संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे असे योगेश एंटरप्रायजेसचे संस्थापक व अध्यक्ष विनायक भोंगाळे म्हणाले.
सातपुडा एज्युकेशन सोसायटीच्या आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, संग्रामपूर येथे योगेश एंटरप्रायजेसच्या वतीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह यशस्वीरीत्या पार पडली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसाठी करिअर घडवण्याची एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली.या कॅम्पस ड्राइव्हला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित होणारा हा पहिलाच कॅम्पस ड्राइव्ह असल्याने विद्यार्थ्यांना एका नव्या अनुभवाला सामोरे जाण्याची संधी मिळाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ. श्रीराम येरणकर होते. समन्वयक म्हणून डॉ. संजय टाले आणि प्रा. मेघा यांनी मोलाची भूमिका बजावली. विशेष अतिथी म्हणून योगेश एंटरप्रायजेसचे सीईओ योगेश भोंगाळे, एसव्हीएसएम एज्युकेशनचे श्रीकांत गुंजाळ, मार्केटिंग हेड शैलेंद्र सिंग तसेच इतर उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना विनायक भोंगाळे म्हणाले, ग्रामीण भागात आजही अनेक ठिकाणी आपल्याला संघर्ष पाहायला मिळतो. हा संघर्ष शिक्षणापासून सुरू होतो तो रोजगारापर्यंत येऊन थांबतो. अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी अभावी आपले करिअर घडवता येत नाही. हजारातून बोटावर मोजण्या इतक्या तरुणांना संधी मिळते. त्यातून त्यांचे जीवन सावरते मात्र ज्यांना संधी मिळत नाही. त्यांना त्याच दलदलीत अडकून पडावे लागते. म्हणूनच या तरुणांना संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठीच हा कॅम्पस ड्राईव्ह घेण्यात आला या कॅम्पस ड्राईव्हला अनेक विद्यार्थी तरुणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे.
हेही वाचा – शरद पवारांनी केलेली ‘ती’ मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली मान्य; केली मोठी घोषणा
योगेश भोंगाळे म्हणाले करिअरसाठी केवळ एमबीए, इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर होणे आवश्यक नाही. तुमचे कौशल्य, कामाबद्दलची निष्ठा आणि तुम्ही ते काम किती आत्मीयतेने करता, हेच यशाचे खरे मोजमाप आहे. तुमच्यात काहीतरी करून दाखवण्याची इच्छाशक्ती असेल, तर यश निश्चितच तुमचं आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःवरील विश्वास, सातत्य आणि प्रामाणिकतेचे महत्त्व पटवून दिले.
या कॅम्पस ड्राइव्हदरम्यान विद्यार्थ्यांची बौद्धिक चाचणी, लेखी परीक्षा, तांत्रिक मुलाखत व व्यक्तिमत्त्व परीक्षण घेण्यात आले. या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांची विचारशक्ती, संवादकौशल्य, व्यावसायिक समज आणि संघभावना यांचे मूल्यमापन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एसव्हीएसएम एज्युकेशनच्या भारती पाटील व डॉ. संजय टाले यांनी केले.
कॅम्पस ड्राईव्ह आयोजित करण्यात आलेल्या संग्रामपूर येथे विनायक भोंगाळे यांचा जन्म झाला .आज ते पुणे शहरातील एक नामवंत बांधकाम व्यावसायिक आहेत. आपल्या यशस्वी प्रवासातून त्यांनी समाजासाठी काहीतरी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. त्यांच्यासारखे अनेक तरुण घडावेत यासाठी ते अविरत कार्यरत आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल कॉलेज प्रशासन, शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांनी योगेश एंटरप्रायजेस आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे विशेष आभार मानले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि रोजगाराच्या दिशेने ठोस पावले उचलण्याची प्रेरणा मिळते असे योगेश भोंगाळे म्हणाले.