राज्यात सात जिल्ह्यांत आज ‘एमआरआय’ सेवेचे लोकार्पण

मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देण्यासाठी सात जिल्ह्यांमध्ये मोफत एमआरआय सेवा सुरू करण्यात येत असून कोल्हापूर, ठाणे, सिंधुदुर्गसह ११ जिल्ह्यांमध्ये डायलिसीस सेवांचा विस्तार करण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या सर्व सेवांचे लोकार्पण दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. या सेवांमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा घराजवळ उपलब्ध होणार आहेत.
प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलिसीस कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील विविध आरोग्य संस्थांमध्ये डायलिसीस सेवा पुरविण्यात येत आहे. याच अनुषंगाने कोल्हापूर, यवतमाळ, बीड, नाशिक, जळगाव, सोलापूर, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे, गडचिरोली आणि रत्नागिरी या ११ जिल्ह्यांतील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये डायलिसीस सेवा सुरू करण्यात येत आहे. या सेवेमुळे किडनी विकारग्रस्त रुग्णांना नियमित व मोफत उपचार मिळणार असून, प्रवासाचा त्रासही कमी होणार आहे. तसेच राज्यातील ९२ आरोग्य संस्थांमध्ये सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर डायलिसीस सेवा यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आली आहे. ही सेवा सर्व रुग्णांसाठी पूर्णपणे नि:शुल्क असून, गुणवत्तापूर्ण उपचार ग्रामीण भागातच उपलब्ध करून देण्याचा सरकारचा उद्देश आहे.
हेही वाचा – लोकलेखा समितीस हलक्यात घ्याल तर…सरकारचा सचिवांना कोणता इशारा
यासोबतच भंडारा, बुलढाणा, अमरावती, नांदेड, धाराशिव, हिंगोली आणि परभणी या सात जिल्ह्यांतील शासकीय रुग्णालयांमध्ये एमआरआय सेवा सुरू करण्यात येत आहे. ही सेवा २४ तास उपलब्ध राहणार असून सर्व शासकीय रुग्णांसाठी पूर्णपणे मोफत असतील. या प्रकल्पासाठी आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ, जसे की तंत्रज्ञ व रेडिओलॉजिस्ट, हे सेवापुरवठादारांमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
डायलिसीस केंद्रे
कोल्हापूर (मुरगुड), यवतमाळ (दारव्हा), बीड (केज), नाशिक (इगतपुरी), जळगाव (रावेर), सोलापूर (मंगळवेढा), सातारा (ढेबेवाडी), सिंधुदुर्ग (वेंगुर्ला), ठाणे (बदलापूर), गडचिरोली (कुरखेडा), रत्नागिरी (दापोली).
एमआरआय केंद्रे
भंडारा, बुलढाणा, अमरावती (संदर्भ सेवा रुग्णालय), नांदेड, धाराशिव, हिंगोली, परभणी.





