ताज्या घडामोडीपुणे

पुण्यात ६७ वा महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न

जनगणना २०२७ प्रक्रिया १ मे पासून सुरू; नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा –राज्यमंत्री माधुरी मिसाळ

पुणे | जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला आज, १ मे २०२६ पासून राज्यभर प्रारंभ होत असून नागरिकांनी या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन नगर विकास व परिवहन राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांनी केले. पोलीस कवायत मैदान येथे त्यांनी महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्या प्रसंगी त्यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

समारंभाला विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त शुभेच्छा देताना राज्यमंत्री मिसाळ यांनी राज्याच्या सामाजिक व ऐतिहासिक वारशाचा उल्लेख केला. महात्मा ज्योतीबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त, तसेच संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंती वर्ष आणि महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘सामाजिक समता व समरसता वर्ष’ साजरे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र ही केवळ भौगोलिक सीमा नसून विचारांची भूमी असल्याचे नमूद करत त्यांनी शौर्य, त्याग, समता आणि प्रगती या मूल्यांवर राज्याचा पाया अधिक भक्कम करण्याची गरज व्यक्त केली. देशाच्या सीमांवर कार्यरत सैनिकांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

हेही वाचा 

भाषेच्या मुद्द्यावरून कुणाला मारणं मान्य नाही; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 

जनगणना २०२७ संदर्भात त्यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना केली जाणार असून १ ते १५ मे दरम्यान नागरिकांना ‘स्व-गणना’ करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यानंतर १६ मे ते १४ जून दरम्यान प्रगणक घरोघरी भेट देऊन माहिती संकलित करतील असे सांगून नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे असे आवाहन केले.

समाजाच्या प्रगतीत शेतकरी, कामगार, शिक्षक आणि युवक यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून सामाजिक समता, बंधुता आणि न्याय यांची जोपासना करण्याचे आवाहन त्यांनी केले. महिलांचा सन्मान, बालकांचे संरक्षण आणि वंचित घटकांचा विकास हीच खरी प्रगती असल्याचे त्या म्हणाल्या. पर्यावरण संवर्धनासाठी पाणी, वृक्ष आणि मातीचे जतन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

शेवटी, स्वच्छ, सुरक्षित आणि समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहन करत त्यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, आमदार भिमराव तापकीर, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा उप निवडणूक अधिकारी मिनल कळसकर याच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button