भाषेच्या मुद्द्यावरून कुणाला मारणं मान्य नाही; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अमराठी रिक्षाचालकांना मराठी भाषा सक्तीची करण्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. या विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयमी पण स्पष्ट शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. “भाषेच्या आधारावर हिंसा किंवा वाद आम्हाला मान्य नाही,” असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी मनसेच्या ‘खळ्ळखट्याक’ स्टाईलवर टीका केली आहे.
महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात आयोजित एका व्याख्यानमालेत बोलताना राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या सरकारच्या निर्णयावर त्यांनी आक्षेप घेतला. “मराठी बोलणार नाही, ही सांगायची हिंमतच कशी होते? जे रिक्षाचालक मराठी शिकण्यास नकार देतात, त्यांचे परवाने थेट रद्द करा. पण सध्याच्या राजकारण्यांना राजकारणाशिवाय काही सुचत नाही. महाराष्ट्राचे हे जे काही वाट्टोळे झाले आहे, त्याला इथले राजकारणीच जबाबदार आहेत,” असे राज ठाकरे म्हणाले.
हेही वाचा
बारावीचा निकाल २ मे ला जाहीर होणार; बोर्डाची अधिकृत घोषणा
महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा चौकात अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या विधानांचा समाचार घेतला. एक तर महाराष्ट्र इतका संकुचित कधीच नव्हता की महाराष्ट्रात परप्रांतीयांनी राहू नये किंवा अमुकच लोकांनी इथे राहावं अशी संकुचित वृत्ती महाराष्ट्रानं कधीच पाळली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो महाराष्ट्र धर्म आपल्याला शिकवला, त्या धर्मालाही ते अपेक्षित नाही. मला तर आनंद आहे की माझा मराठी बांधव मी देशाच्या कुठल्याही राज्यात गेलो, तरी तिथला महत्त्वाचा नागरिक म्हणून त्या त्या संस्कृतीत, राज्याच्या विकासात भर टाकताना दिसतोय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भाषेबाबत बोलायचं तर स्वभाषेचा, मराठी भाषेचा अभिमान असलाच पाहिजे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकानं मराठी भाषा शिकलीच पाहिजे. मला नक्कीच असं वाटतं की जे लोक महाराष्ट्रात वास्तव्यास आहेत, ते मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतील. जे शिकले नाहीत, त्यांना शिकवण्याचा प्रयत्न आम्ही करू. पण भाषेच्या आधारावर हिंसा, भाषेवर विवाद, भाषा येत नाही म्हणून कुणाला मारणं हे आम्हाला मान्य नाही. यातला मार्ग हा आहे की आपली भाषा इतकी सुंदर आणि सोपी आहे की कुणालाही शिकवता येते. त्यामुळे या सर्व लोकांना मराठी भाषा शिकवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.





