पिंपरी / चिंचवड
ताथवडेत भर दिवसा घरफोडी
पिंपरी | प्रतिनिधी
ताथवडे येथील साई कॉलनीमध्ये सोमवारी सकाळी साडेनऊ ते दुपारी पावणे चार वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. यामध्ये सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले आहेत.
शिवाजी मोहन सपकाळ वय 31, रा. साई कॉलनी, ताथवडे यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर सोमवारी सकाळी साडेनऊ ते दुपारी पावणे चार वाजताच्या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने घराचे लॉक तोडून घरातून तेहतीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.