TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाची ‘१०० पार’च्या दिशेने घोडदौड !

  •  पुन्हा कमळ फुलणार : संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांचा विश्वास
  •  विश्वासदर्शक ठरावाच्या बाजुने मतदान करणाऱ्या सदस्यांचे मानले आभार

पिंपरी । प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या १५ दिवसांतील वेगवान घडामोडींनंतर भाजपा-शिवसेना सरकारने विश्वासदर्शक ठराव १६४-९९ अशा फरकाने जिंकला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे बहुमत सिद्ध झाले आहे. आता खऱ्या अर्थाने जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्याने विधानसभेत सरकार स्थापन झाले. याच धर्तीवर आता आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपा १०० पार करेल, असा विश्वास भाजपा संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपा- शिवसेना (शिंदे गट) सरकारने सोमवारी विधानसभा सभागृहात विश्वास दर्शक ठराव जिंकला. २०१९ मध्ये जनमत भाजपा व शिवसेना युतीला होते. मात्र, महाविकास आघाडीचा प्रयोग करुन जनमताचा अनादर करण्यात आला. आता खऱ्या अर्थाने सत्तेवर आलेले हे सरकार जनकल्याणासाठी समर्पित भावनेने काम करेल, असेही अमोल थोरात यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्यात सत्ता परिवर्तन झाल्याबद्दल पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात येणार असून, शहराचे अध्यक्ष व आमदार महेश लांडगे मुंबईहून परतल्यानंतर आनंदोत्सवाचा कार्यक्रम घेण्यात येईल. भाजपाची संघटनात्मक बांधणी सक्षम असून, बूथ यंत्रणाही मजबूत करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली आगामी महापालिका निवडणुकीत १०० हून अधिक जागा भाजपा निश्चितपणे जिंकणार आहे, असा दावाही अमोल थोरात यांनी केला आहे.
**
चार सदस्यीय प्रभागासाठी आग्रही…
राज्यात भाजपाच्या विचारांचे सरकार आले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेली महापालिका निवडणूक प्रभाग रचना राजकीय हस्तक्षेपातून तयार झाली आहे. प्रभागांची नियमबाह्यपणे तोडफोड करण्यात आली होती. तसेच, मतदार यांद्यांचाही घोळ आहे. मतदान स्थलांतरीत करण्याचा प्रकार घडला आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही नव्या सरकारकडे चार सदस्यीय प्रभागपद्धतीनुसार निवडणूक घेण्याचा आग्रह करणार आहोत, असेही अमोल थोरात यांनी म्हटले आहे.
**
पिंपरी-चिंचवडमध्येही राजकीय भूकंप…
राज्यातील सत्तासमीकरणे बदलल्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील राजकीय अस्वस्थता वाढली आहे. शहरातील शिवसेनेसह राष्ट्रवादीचे अनेक माजी नगरसेवक भाजपाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आगामी काळात राजकीय भूकंप होईल. गेल्या काही दिवसांपासून भाजपातील नाराज आमच्या संपर्कात आहेत, अशा अणाभाका घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पायाखालील वाळू आता सरकणार आहे, असा टोलाही अमोल थोरात यांनी लगावला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button