पिंपरी / चिंचवड

पिंपरी, वाकड, देहूरोड, निगडीत जबरी चोरीच्या पाच घटना

पिंपरी | प्रतिनिधी

पिंपरी, वाकड, देहूरोड, निगडी परिसरात जबरी चोरीच्या पाच घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी मंगळवारी (दि. 22) संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

पिंपरी येथील घटनेत पवन अनिल क्षीरसागर (वय 31, रा. पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश उर्फ पोंग्या (वय 25) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 21) रात्री सव्वा सात वाजता भीमनगर पिंपरी येथे फिर्यादी त्यांच्या भावाशी बोलत थांबले असताना आरोपी तिथे आले. फिर्यादी यांच्या भावाला आरोपींनी चाकू सारखे धारदार शस्त्र दाखवून त्याच्या खिशातून पाचशे रुपये काढून घेतले. त्यानंतर फिर्यादी यांना तुझ्याजवळ जेवढे पैसे आहे ते गोडीगुलाबीने काढून दे, अशी धमकी दिली. पैसे देण्यासाठी फिर्यादी यांनी नकार दिला असता आरोपीने त्यांच्यावर चाकू सारख्या धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

वाकड येथील गुन्ह्यात नागेश गोपाळ बुद्रुके (वय 40, रा. चाकूर, उमरगा, उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांची फोर्स मोटर ट्रॅक्स घेऊन काळेवाडी फाटा येथे एका हॉस्पिटल समोर थांबले होते. त्यावेळी तीन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांच्या गाडीत बसून त्यांना शिवीगाळ केली. त्यांच्या खिशातून दोन हजार रुपये जबरदस्तीने चोरून घेतले. त्यानंतर फिर्यादी यांच्या गाडीची तोडफोड करत 20 हजार रुपयांचे नुकसान केले. दरम्यान तिथे जमलेल्या लोकांना जीवे मारण्याची धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

वाकड परिसरातील दुसऱ्या गुन्ह्यात सुरेश ईश्वर चव्हाण वय 38, रा शिवडे, उंब्रज, ता. कराड, जि. सातारा यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋषिकेश महादेव चव्हाण वय 26, शुभम शांताराम दुबे वय 21, दोघे रा. थेरगाव आणि अन्य दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची ट्रक घेऊन काळेवाडी फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्याने जात होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांचा ट्रक अडवला. ट्रकच्या काचा फोडून फिर्यादी यांना शस्त्राचा धाक दाखवून मोबाईल फोन, रोख रक्कम हिसकावून घेतली. तसेच तोडफोड करून ट्रकचे दोन हजार रुपयांचे नुकसान केले. यानंतर आरोपी तलवार फिरवत जोरजोरात ओरडत दहशत पसरवून निघून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

देहूरोड येथील गुन्ह्यात एका महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 14 टाळकरी कमानीकडून वैकुंठ मंदिराकडे जात होत्या. त्यावेळी दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे 60 हजार रुपयांचे गंठण जबरदस्तीने ओढून चोरून नेले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात एका महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला संभाजीनगर येथून पायी चालत घरी जात होत्या. त्यावेळी त्यांच्या मागून आलेल्या एका अनोळखी चोरट्याने फिर्यादी यांच्या हातातून त्यांचा आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन हिसकावून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button