पॉर्न व्हिडिओवरुन विवाहित महिलेचे ब्लॅकमेलिंग, ६० लाख उकळले

पॉर्न व्हिडिओमध्ये मॉर्फ केलेले फोटो वापरुन एका विवाहित महिलेला ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्लॅकमेलिंग असहय्य झाल्यानंतर पीडित महिलेने पोलिसांशी संर्पक साधला. बंगळुरुच्या राजाजीनगरमध्ये राहणाऱ्या या महिलेचा पती बिझनेसमॅन आहे. तिने तिच्याकडे घरकाम करणाऱ्या महिलेसह सहा जणांवर ब्लॅकमेलिंगचा आरोप केला. त्यांनी मागच्या दीडवर्षात या महिलेकडून ६० लाख रुपये उकळले.
२०१६ ते २०१८ दरम्यान या टोळक्याने फक्त महिलेकडून पैसेच उकळले नाहीत तर त्यांनी पीडित महिलेच्या मुलीला देखील त्रास दिला. महिलेची मुलगी एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. पीडित महिलेने फेब्रुवारी २०१६ मध्ये लक्ष्मी नावाच्या महिलेला आपल्याकडे घरकामासाठी ठेवले. लक्ष्मीने मैत्रीण पवित्रा तिचा नवरा प्रशांत आणि अन्य तीन साथीदारांच्या मदतीने मिळून महिलेचे ब्लॅकमेलिंग सुरु केले.
या टोळीने पीडित महिलेचे फोटो वापरुन एक पॉर्न व्हिडिओ तयार केला. त्यांनी पीडित महिलेला हा व्हिडिओ दाखवून तिच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. पैसे दिले नाही तर व्हिडिओ ऑनलाइन अपलोड करण्याची ते धमकी द्यायचे असे पीडित महिलेने सांगितले. त्रास असहय्य झाल्यानंतर या महिलेने पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली. फसवणूक, कारस्थान आणि खंडणीच्या कलमाखाली पोलिसांनी गु्न्हा दाखल करुन आरोपीचा शोध सुरु केला आहे.





