श्री मार्तंड देवसंस्थानचा पूरग्रस्तांसाठी माणुसकीचा हात; १ कोटी ११ लाखांची मदत जाहीर!
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा; सामुदायिक विवाह सोहळ्याचा प्रस्तावही पुढे

जेजुरी : राज्यातील विविध भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, मराठवाड्यात तर या पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. शेकडो शेतकऱ्यांचे संसार उघडे पडले आहेत, घरादारांचे नुकसान तर झालेच, पण कुटुंबांच्या आयुष्यावरच गदा आली आहे. या कठीण प्रसंगी जेजुरीच्या श्री मार्तंड देवसंस्थानने सामाजिक बांधिलकी जपत, १ कोटी ११ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
हा निर्णय देवसंस्थानच्या ट्रस्ट बैठकीत एकमताने घेण्यात आला असून, त्याची घोषणा न्यासाचे अध्यक्ष श्री. मंगेश घोणे यांनी मर्दानी दसरा सोहळा २०२५ च्या सांगतेनंतर केली. या बैठकीस श्री. अभिजीत देवकाते, डॉ. राजेंद्र खेडेकर, अॅड. विश्वास पानसे, श्री. अनिल सौंदडे, अॅड. पांडुरंग थोरवे व श्री. पोपट खोमणे उपस्थित होते.
“पूरग्रस्तांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. देवसंस्थान समाजासाठी नेहमीच पुढे राहिले आहे, आणि पुढेही राहील,” असा विश्वास अॅड. पांडुरंग थोरवे यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा – घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना 10 टक्के मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा; राज्याच्या वाळू धोरणात मोठे बदल
दानधर्मातून पूरग्रस्तांना आधार : सामुदायिक विवाहाचा प्रस्ताव
जेजुरी ग्रामस्थांनी मांडलेली महत्त्वाची सूचना म्हणजे – या निधीतून केवळ मुख्यमंत्री निधीकडे वाट न पाहता, प्रत्यक्ष मदतीचा हात पुढे करावा. विशेषतः पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींसाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून त्यांचे संसार उभे करण्यासाठी मदतीचा उपयोग व्हावा, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. मंदिरात आलेल्या दान-धनाचा योग्य उपयोग करत गरजू, निराधार कुटुंबीयांना थेट मदत मिळावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे देवसंस्थानने केवळ आर्थिक मदतीतच नव्हे, तर समाजकल्याणाच्या दिशेने एक आदर्श पाऊल उचलले आहे.
देवसंस्थानचा मदतीचा इतिहास
कोरोना काळ असो वा दुष्काळसदृश परिस्थिती – श्री मार्तंड देवसंस्थानने वेळोवेळी आपत्तीग्रस्तांच्या मदतीला धाव घेतली आहे. यावेळीही तीच परंपरा जपत, मदतीचा निर्णय घेतला गेला आहे. श्री क्षेत्र जेजुरी येथील या ऐतिहासिक मंदिराकडून आलेली ही मोठी मदत, समाजमनात विश्वास निर्माण करणारी ठरत आहे.




