ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बोपोडी-खडकीमार्गे वाहतूक वळविल्याने अपघातात वाढ!

वाहतूक पूर्ववत करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा छावा मराठा संघटनेचा इशारा

पिंपरी: मेट्रोचे काम पूर्ण झाल्याने खडकी बाजार मार्गे वळविण्यात आलेली वाहतूक जुन्या मुंबई-पुणे मार्गवरून पूर्ववत करण्यात आल्याने खडकीकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला होता; मात्र, पुन्हा ही वाहतूक बोपोडीतून खडकीमार्गे वळविल्याने वाहतूक कोंडी होऊन अपघातात वाढ झाली आहे. त्यामुळे ही वाहतूक पूर्ववत करून खडकीकरांची वाहतूक कोंडी व अपघातांमधून मुक्तता करावी, अशी मागणी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी केली आहे.

जुन्या पुणे मुंबई रस्त्यावरील वाहतूक बोपोडी-खडकी बाजारमार्गे ऑल सेंट स्कुलजवळून वळविण्यात आल्याने मोठी वाहतूक कोंडी होत असून, सांगवी, पिंपळे गुरवमधून पुण्यात जाण्यासाठी नागरिकांना उशीर होत आहे. त्यामुळे किमान येथील वाहतुकीचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. वाहनांमुळे खडकीमधील नागरिकांना वाहतूक कोंडी सोबतच अपघातांचाही सामना करावा लागत आहे.
तसेच या वाहतुकीचा फटका खडकी बाजार परिसरातील अनेक शाळांतील विद्यार्थ्यांना बसत आहे. विशेषतः सांगवी, पिंपळे गुरव, बोपोडीतून खडकी बाजार परिसरातील लालबहादूर शास्त्री शाळा, आलेगावकर शाळा, एस.व्ही.एस. स्कुल, सेंट जोसेफ स्कुल, तसेच पुण्यात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे. दररोज तास-दोन तास वाहतूक कोंडीत विद्यार्थ्यांना अडकून पडावे लागत आहे. त्यातच उन्हाळा असल्याने उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे.

बोपोडी ते खडकी स्टेशन दरम्यान मेट्रोचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे जुन्या पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक बोपोडीतून खडकी बाजार मार्गे वळविण्यात आली आहे. या मार्गावर किर्लोस्कर ऑइल इंजिन कंपनी, तसेच झोपडपट्टीही आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यातच विद्यार्थ्यांची आणि पालकांची वर्दळ असते. पेन्शनर ज्येष्ठ नागरिक, महिला, कंपनीतील कामगार आदी सर्वांना नित्याच्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.

एका पादचाऱ्याला जीव गमवावा लागला…
याबाबत रामभाऊ जाधव यांनी सांगितले, की पुन्हा खडकीमधून वळविण्यात आलेल्या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. दोन दिवसापूर्वी या वाहतुकीमुळे एका पादचाऱ्याला जीव गमवावा लागला आहे. असे अनेक अपघात गेल्या दीड वर्षांपासून घडत असूनही वाहतूक पोलिसांकडून ठोस नियोजन केलेले दिसत नाही. हे टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे योग्य नियमन करण्याची गरज आहे. अन्यथा छावा मराठा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button