breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“सर्वात जास्त दारू पिणारे लोक भाजपात आहेत”- नवाब मलिक

मुंबई |

भाजपाबरोबरच विविध स्तरांतून होणाऱ्या विरोधाला न जुमानता राज्यातील द्राक्ष बागायतदार तसेच वाइन उद्योगास चालना देण्यासाठी सुपर मार्केट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइन विक्रीस परवानगी देण्याच्या निर्णयावर बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र यापूर्वी राज्यातील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजपाकडून होणाऱ्या विरोधावर टीका करताना भाजपा नेत्यांची भूमिका ही दुटप्पी असल्याचे आरोप करत त्यांच्यावर हल्लाबोल केला. इतकच नाही सर्वात जास्त दारू पिणारे लोक भाजपात आहेत, असंही मलिक म्हणाले.

“वाइन विक्रीचा निर्णय सरकारने मागील आठवड्यामध्ये घेतला. शिवराज सरकारने (मध्य प्रदेश), हिमाचल सरकारने, गोवा सरकारने हाच निर्णय घेतला होता की नाही हे त्यांनी सांगावं,” अशी मागणी नवाब मलिक यांनी केलीय. तसेच पुढे बोलताना, “वाइन विक्रीच्या निर्णयाचा विरोध होतोय. भाजपा विरोध करतेय. त्यांच्या नेत्यांचे दारु निर्मितीचे कारखाने आहेत. त्याचे परवाने भाजपाचे नेते सरेंडर करणार का हा प्रश्न त्यांना आम्ही विचारु इच्छितो,” असंही मलिक म्हणाले. “(भाजपाचे) अनेक नेते मद्यनिर्मिती उद्योगामध्ये आहेत. अनेक नेत्यांची वाइन विक्री आणि मद्यविक्रीची दुकानं आहेत. काही लोकांचे बार आहेत. सर्वात जास्त दारू पिणारे लोक हे भाजपात आहेत. त्यांची तर एक नेता सांगतेय की थोडी थोडी पित जा,” असंही मलिक म्हणाले. तसेच त्यांनी, “कधी तुम्ही हे सारे परवाने सरेंडर करणार हे भाजपाने सांगावं तसेच आजपासून आम्ही दारु पिणार नाही अशी शपथ भाजपाच्या नेत्यांनी घ्यावी,” अशी मागणीही केली.

राज्यात सुपर मार्केट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइन विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय गेल्या आठवडय़ात मंत्रिमंडळाने घेतला होता. मात्र महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा देत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या या निर्णयास विरोध केला होता. त्यानंतर भाजपाने राज्यभरात या निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला असून सामाजिक क्षेत्रातूनही या निर्णयास विरोध होत आहे. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकार वाइनबाबत कोणती भूमिका घेते याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. मात्र बुधवारी या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. मागील मंत्रिमंडळ बैठकीचे इतिवृत्त कायम करण्यासाठी मंत्रिमंडळासमोर आले त्या वेळी भाजपाच्या विरोधाला न जुमानता या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यानुसार इतिवृत्त मंजूर करण्यात आले. त्यामुळे सुपर मार्केट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइन विक्रीचा मार्ग मोकळा झाल्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button