breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

महिला मजुराच्या प्रसंगावधानामुळे बिबटय़ाच्या हल्ल्यातून मुल बचावले

सांगली |

एका महिला मजुराने प्रसंगावधान राखत अन्य लोकांना जागे केल्याने बिबटय़ाच्या जबडय़ात असलेल्या सहा वर्षांच्या तोडकर मजुराच्या मुलाचा प्राण वाचला. शिराळा तालुक्यातील तडवळे येथे ही घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली असून जखमी मुलाला सांगलीतील वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तडवळे येथील गोल पाणंद परिसरात शिवाजी पाटील यांच्या उसाची तोड सुरू होती. मंगळवारी सायंकाळी तोडलेला ऊस ट्रॅक्टरमध्ये भरण्याचे काम सुरू होते. यावेळी गणेश श्रीराम कामबीलकर ( वय ६, रा. मानकुरवाडी, बीड) हा मुलगा ट्रॅक्टरच्या पुढील बाजूस होता. अंधाराचा फायदा घेत आलेला बिबटय़ा या मुलाला तोंडात धरून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. हा प्रकार दुर्गा दुरंदरे या मजूर महिलेने पाहताच तिने आरडाओरड केली. यामुळे उसाचे ट्रॅक्टर भरणारे मजूर तातडीने धावले. तेवढय़ा अवधीत काही अंतरही मुलाला जबडय़ात धरून बिबटय़ा पसारही झाला होता. सर्वानीच दंगा करीत पाठलाग सुरू करताच मुलाला काही अंतरावर टाकून बिबटय़ाने धूम ठोकली.

जखमी व भेदरलेल्या मुलाला तातडीने शिराळा येथील आरोग्य उपकेंद्रामध्ये नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी रात्रीच सांगलीला हलविण्यात आले आहे. एका महिलेच्या प्रसंगावधानाने मुलाची बिबटय़ाच्या जबडय़ातून सुटका झाली. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी सचिन जाधव, चंद्रकांत देशमुख, हणमंत पाटील, अक्षय शिंदे यांनी बिबटय़ाची शोधमोहीम सुरू केली आहे. दरम्यान, याच परिसरात गेल्या वर्षी ऊसतोड सुरू असताना जाईच्या विहिरीजवळ बंडा पाटील यांच्या शेतात शमशुद्दीन शेख यांच्या मुलाला बिबटय़ाने पळविले होते. त्यावेळीही आरडाओरडा केल्याने मुलाला टाकून बिबटय़ाने पलायन केले होते. मात्र, मुलाचा मृत्यू झाला होता.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button