आर्यन खान तुरुंगातच! जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी
मुंबई – क्रूझ ड्रग्स केस प्रकरणी गेल्या १८ दिवसांपासून अटकेत असलेल्या आर्यन खानचा तुरुंगवास आणखी वाढला आहे. काल (बुधवारी) मुंबईतील विशेष एनडीपीएस न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्याचे वकील सतीश मानेशिंदे आणि अमित देसाई यांनी तात्काळ मुंबई उच्च न्यायालयात विशेष एनडीपीएस न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी आर्यन खान आणि इतरांच्या जामीन अर्जावर पुढील मंगळवारी सुनावणी करण्यात येईल, असा निर्णय देण्यात आला. त्यामुळे आर्यनचा तुरुंगातील मुक्काम मंगळवारपर्यंत वाढला आहे.
आजच्या सुनावणीत आर्यनच्यावतीने वकील मानेशिंदे यांनी न्यायालयात बाजू मांडण्यास सुरुवात केली, त्यांनी जामीन अर्जावर उद्या किंवा सोमवारी सुनावणी ठेवण्याची विनंती करत आमच्या अशिलाकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नसल्याचा युक्तिवाद केला. त्यावर एनसीबीचे वकिल अनिल सिंग यांनी जामीन अर्जाची प्रत मिळाली नसल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने मंगळवारी सुनावणी घेण्याचे निश्चित केले. आता मंगळवारी 26 ऑक्टोबरला यावर सुनावणी होणार आहे. मुनमुन धामेचा हिच्या जामीन अर्जावरदेखील मंगळवारी सुनावणी होणार आहे.
दरम्यान, आर्यनच्या वकिलांसमोर 30 ॲाक्टोबरपर्यंतचा वेळ आहे. कारण त्यानंतर 12 दिवस कोर्टाला दिवाळीची सुट्टी असणार आहे. जर या 7 दिवसांत कोर्टात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद होऊन कोर्टाने आपला निर्णय दिला नाही तर आर्यन खानला दिवाळीपर्यंत तुरुंगातच राहावे लागेल.