अमित शहा २३ ऑक्टोबरपासून ३ दिवस काश्मीरच्या दौऱ्यावर
नवी दिल्ली – कलम 370 रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 23 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत जम्मू आणि काश्मीरच्या तीन दिवसीय दौऱ्यावर जाणार असून ते जम्मू काश्मीरच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी आणि सेंट्रल पॅरामिलिट्री फोर्सेसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या दौऱ्यात शहांकडून विविध विकास प्रकल्पांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दहशतवादी हल्ले सुरू असल्याने जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सध्या जम्मू काश्मीरमध्ये परप्रांतीय नागरिकांवरील दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 18 दिवसांमध्ये दहशतवादी संघटनांकडून 11 नागरिकांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे अमित शहा यांनी केंद्रीय तपास संस्था, राज्यांचे पोलीस महासंचालक आणि गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक घेतली. त्यानंतर गृहमंत्र्यांनी दुसऱ्याच दिवशी जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षेविषयी पंतप्रधानांना माहिती दिली. सध्याच्या हिंसाचारावर कडक कारवाई करण्याची शहा यांनी सुरक्षा संस्थांना सूचना दिली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये परप्रांतीय नागरिकांवर दहशतवादी हल्ले वाढल्याने स्थलांतरित मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.