breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

”एक देश, एक निवडणूक’ विधेयक महत्वाचं’; अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : केंद्र सरकारने अचानक १८ ते २२ सप्टेंबर या पाच दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. तसेच ‘एक देश, एक निवडणूक’ चा फॉर्म्युला लागू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदी सरकारच्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या संकल्पनेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अजित पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मांडलेली ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही भूमिका देश आणि राज्यांच्या शाश्वत विकासासाठी पूरक आहे. देशात अनेक राज्यात सातत्यानं कुठे ना कुठे निवडणुका होत असतात. यामुळे वेळ, पैसा आणि मनुष्यबळाचा अपव्यय होतो. विकासकामांकडे पुरेसं लक्ष देता येत नाही, त्यामुळे विकास खुंटतो. ‘वन नेशन, वन इलेक्शन’मुळे एकाच वेळी निवडणुका होतील आणि उर्वरित वेळ विकासकामांना गती देण्यासाठी उपयोगात आणता येईल.

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे लोकसभा निवडणूक लढवणार? माजी खासदार म्हणाले..

पंतप्रधान महोदयांनी वेळोवेळी मांडलेल्या आणि केंद्र सरकारनं आता पुढाकार घेतलेल्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिकेकडे सर्वांनी सकारात्मकपणे पाहायला हवं. केंद्राची ही भूमिका समर्थनीय आणि स्वागतार्ह आहे, असं अजित पवार म्हणाले.

काळाप्रमाणे व्यवस्थेत सुधारणा अपरिहार्य असतात. परंतु, त्या सुधारणा देश आणि लोकहिताच्या असल्या पाहिजेत. पंतप्रधान महोदयांच्या नेतृत्वाखाली विद्यमान केंद्र सरकारनं ते धाडस दाखवलं आहे. केंद्राच्या या भूमिकेमुळे देशाच्या आणि राज्यांच्या समोरचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल. विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल. यापूर्वी ‘वन नेशन, वन टॅक्स’ हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं सर्व राज्यांच्या सहमतीनं अंमलात आणला आणि यशस्वी करुन दाखवला. त्याच धर्तीवर ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही भूमिका देशवासियांकडून मनापासून स्वीकारली जाईल असा विश्वास आहे. मी आणि राष्ट्रवादी काँग्रस पक्ष या भूमिकेचं स्वागत करतो, असंही अजित पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button