breaking-newsक्रिडा

IPL 2018 : विजयासाठी आसुसलेल्या राजस्थानसमोर चेन्नईचे आव्हान

 बाद फेरी निश्‍चित करण्यासाठी चेन्नईचा प्रयत्न 
जयपूर – आयपीएलच्या अकराव्या हंगामात चांगला संघ असूनही आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नसल्याने गुणतालिकेत सहाव्या स्थानी असलेल्या माजी विजेत्या राजस्थान रॉयल्ससमोर आज रंगणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यात बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान आहे. चालू हंगामात स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी राजस्थान रॉयल्सचा संघ सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र राजस्थानला आतापर्यंत झालेल्या 10 सामन्यांपैकी केवळ 4 सामने जिंकता आले असून त्यांचे 8 गुण झाले आहेत. अशा परिस्थितीत स्पर्धेच्या साखळी फेरीतील उरलेले सर्व सामने जिंकणे राजस्थानला आवश्‍यक आहे.

पंजाबविरुद्धच्या सामन्यात राजस्थानच्या संघाची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली होती. गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे पंजाबवर विजय मिळवत राजस्थानने स्पर्धेतील आपले आव्हान टिकवले होते. मात्र त्या सामन्यात त्यांचा जोस बटलर वगळता इतर इतर फलंदाज चाचपडताना दिसले. त्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले होते. उद्याच्या सामन्यात विजय मिळवायचा असल्यास राजस्थानला फलंदाजीत सुधारणा करणे गरजेचे आहे. चेन्नईविरुद्ध त्यांचा या हंगामातील हा दुसरा सामना आहे. गेल्या सामन्यात चेन्नईच्या फलंदाजांनी राजस्थानच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत 205 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात राजस्थानच्या गोलंदाजांप्रमाणेच त्यांचे फलंदाजही अपयशी ठरल्याने त्यांना 64 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.

तर दुसरीकडे हंगामात समतोल कामगिरी करताना आपल्या 10 पैकी 7 सामने जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असलेल्या चेन्नई संघाने प्ले-ऑफ फेरीतील आपले स्थान जवळपास निश्‍चित केले आहे. चालू हंगामात फलंदाज आणि गोलंदाजांच्या समतोल कामगिरीमुळे चेन्नईचा संघ स्पर्धेतील सर्वात बलाढ्य संघ समजला जातो आहे. त्यातच त्यांचे सलामीवीर अणि मधल्या फळीतील फलंदाज खोऱ्याने धावा करीत असल्याने कोणत्याही संघाला त्यांना रोखण्यात अपयश येत आहे. तर दुसरीकडे त्यांचे गोलंदाज प्रभावी ठरत असल्याने प्रतिस्पर्धी संघाला पुरेशा धावा करण्यात अपयश येत आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात राजस्थानपेक्षा चेन्नईच्या संघाचे पारडे निश्‍चितच जड आहे. राजस्थानवर विजय मिळवून गुणतालिकेत पुन्हा एकदा अग्रस्थानी झेप घेण्यासाठीच चेन्नई संघ उत्सुक असणार.

प्रतिस्पर्धी संघ – 
चेन्नई सुपर किंग्ज – महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, रवींद्र जडेजा, फाफ ड्यु प्लेसिस, हरभजन सिंग, ड्‌वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, केदार जाधव, अंबाती रायुडू, दीपक चाहर, के.एम.आसिफ, कनिष्क सेठ, लुंगी एन्गिडी, ध्रुव शौर्य, मुरली विजय, सॅम बिलिंग, मार्क वूड, क्षितिज शर्मा, मोनू कुमार, चैतन्य बिश्‍नोई, इम्रान ताहिर, कर्ण शर्मा, शार्दूल ठाकूर व एन. जगदीशन.

राजस्थान रॉयल्स – अजिंक्‍य रहाणे (कर्णधार), अंकित शर्मा, संजू सॅमसन, बेन स्टोक्‍स, धवल कुलकर्णी, जोफ्रा आर्चर, डीआर्की शॉर्ट, दुश्‍मंथा चमीरा, स्टुअर्ट बिन्नी, श्रेयस गोपाल, एस. मिथुन, जयदेव उनाडकत, बेन लाफलिन, प्रशांत चोप्रा, कृष्णप्पा गौतम, महिपाल लोमरोर, जतिन सक्‍सेना, अनुरीत सिंग, आर्यमान बिर्ला, जोस बटलर, हेन्‍रिच क्‍लासेन, झहीर खान आणि राहुल त्रिपाठी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button