पिंपरी / चिंचवड
थोपटे लॉन्स मधून आहेराची बॅग चोरीला
पिंपरी l प्रतिनिधी
लग्नाच्या मंडपातून बंद पाकीट आणि सोन्याचे दागिने असलेली बॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना 23 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता थोपटे लॉन्स रहाटणी येथे घडली.
रामनकुट्टी पद्मनाभन नायर (वय 60, रा. पिंपरीगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कुटुंबातील विवाह सोहळा रहाटणी येथील लॉन्स येथे होता. त्यात फिर्यादी यांच्या आहेराच्या पाकिटाची बॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेली. त्यात दोन लाख 75 हजार रुपयांची आहेराची पाकिटे आणि 25 हजारांचे सोन्याचे कॉईन असा एकूण तीन लाख रुपयांचा ऐवज होता. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.